Nitin Gadkari : गडकरींना मोदींचे उत्तराधिकारी बनवावे; ‘या’ काँग्रेस नेत्याने केली अनपेक्षित मागणी

बंगळुरू : कर्नाटकमधील कॉंग्रेसचे आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी भाजपला अनपेक्षित असा मागणीवजा सल्ला दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी बनवावे, असे त्यांनी म्हटले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जबाबदारीतून मुक्त होण्याविषयीचे वक्तव्य केले.
संबंधित वक्तव्य एका बाणाने दोन लक्ष्ये साधण्यासारखे आहे. ते भागवत आणि मोदी या दोघांनाही लागू होते, अशी प्रतिक्रिया याआधी कॉंग्रेसच्या गोटातून देण्यात आली. त्या प्रतिक्रियेतून कॉंग्रेसने भागवत आणि मोदी हे दोघेही लवकरच वयाची पंचाहत्तरी पार करणार असल्याकडे लक्ष वेधले. तो धागा पकडून गोपालकृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना एकप्रकारे भाजपला डिवचणारी भूमिका मांडली.
मोदी पदमुक्त झाल्यास गडकरी यांना पुढील पंतप्रधान बनवले जावे. गडकरी हे मोदींचे आदर्श उत्तराधिकारी ठरतील. कारण, गडकरी सामान्य माणसासमवेत आहेत. त्यांनी महामार्ग आणि इतर बाबतींत देशाच्या विकासासाठी चांगले कार्य केले आहे. देशाची जनता त्यांनी केलेली सेवा, त्यांचे व्यक्तिमत्व जाणून आहे. सरसंघचालकांनी दिलेले संकेत पाहता गडकरींची वेळ आली असल्याचे वाटते, असे ते म्हणाले.
कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस.येडियुरप्पा यांचेही उदाहरण गोपालकृष्ण यांनी दिले. वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतर येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले गेले. मात्र, भाजपचा कुठलाच नेता मोदींविषयी बोलताना दिसत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.





