BCCI Meeting : BCCI चा मोठा निर्णय! बंगळुरूच्या ‘COE’मध्ये तातडीने होणार भरती; लक्ष्मणच्या उपस्थितीत बैठक संपन्न

BCCI Meeting about Center of Excellence : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बंगळुरू येथील नवनिर्मित ‘सेंटर ऑफ एक्सलेंस’ (CoE) च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत केंद्रातील रिक्त पदे भरण्यासह भविष्यातील क्रिकेट दौऱ्यांच्या नियोजनावर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या पदांची होणार भरती –
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेंटर ऑफ एक्सलेंस’ गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले असले तरी, तिथे काही तांत्रिक पदे अद्याप रिक्त आहेत. यामध्ये ‘हेड ऑफ एज्युकेशन’ आणि ‘हेड ऑफ स्पोर्ट्स सायन्स’ यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. जगभरात तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी, बीसीसीआय ही प्रक्रिया वेगवान करून लवकरच या नियुक्त्या पूर्ण करणार आहे.
इंडिया ‘ए’ आणि ‘अंडर-१९’ दौऱ्यांचे नवे नियोजन –
Had a fruitful meeting with VVS Laxman, Head of BCCI’s Centre of Excellence, in the presence of BCCI office bearers today at Mumbai. Reviewed current activities and charted the roadmap for the Centre’s future course, aimed at further strengthening India’s cricketing talent… pic.twitter.com/nw1PibqDV1
— Devajit LON Saikia (@lonsaikia) January 9, 2026
बैठकीत भविष्यातील दौऱ्यांबाबत एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला. अनेकदा वरिष्ठ भारतीय संघ आणि इंडिया ‘ए’ संघ एकाच वेळी दौऱ्यावर असतात. भविष्यात असे होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. “इंडिया ‘ए’ चे दौरे भविष्यातील खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, त्यामुळे या दौऱ्यांचे वेळापत्रक वरिष्ठ संघाच्या दौऱ्यांशी भिडणार नाही, याची खात्री केली जाईल,” असे सैकिया यांनी स्पष्ट केले.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांची उपस्थिती –
या उच्चस्तरीय बैठकीला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, अध्यक्ष मिथुन मनहास, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सेंटर ऑफ एक्सलेंसचे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. सध्या या केंद्रातील तीन मैदानांवर विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरू असून तिथल्या सोयीसुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
काय आहे ‘सेंटर ऑफ एक्सलेंस’?
फेब्रुवारी २०२२ मध्ये पायाभरणी झालेले हे केंद्र भारतीय खेळाडूंसाठी ‘हाय-टेक’ सुविधांचे माहेरघर आहे:
- मैदानं: आंतरराष्ट्रीय दर्जाची ३ भव्य क्रिकेट मैदाने.
- जिम आणि रिकव्हरी: १६,००० स्क्वेअर फुटांची आधुनिक जिम, ज्यामध्ये स्लीपिंग पॉड्स, जकूजी, सौना आणि स्टीम बाथची सुविधा आहे.
- इतर सोयी: २५ मीटरचा स्विमिंग पूल, अंडरवॉटर पूल स्पा आणि ४ ॲथलेटिक ट्रॅक.
- वैद्यकीय सुविधा: स्पोर्ट्स सायन्स लॅब आणि फिजियोथेरपी रिहॅब सेंटर, जिथे खेळाडूंच्या दुखापतींवर उपचार केले जातात.





