पती-पत्नीने 4 वर्षीय चिमुकलीसह संपवले जीवन; संभाजीनगरातील धक्कादायक घटना!

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरातील वळदगावमध्ये एकाच कुटूंबातील तिघांची जिवनयात्रा संपल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती – पत्नी आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर ( 28 ) , पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) अशी मृतांची नावे आहेत.
सातारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वळदगावमध्ये उपसरपंच संजय झळके यांच्या घरी डांगर कुटुंब भाड्याने राहत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री या दामपत्त्यामध्ये भांडण झाले. यानंतर प्रथम मुलीला गळफास देऊन नंतर पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज सकाळी घटना उघडकीस आली असून सातारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी सांगितले की, या घटनेची माहिती डांगर यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून ते आल्यानंतरच नेमका काय वाद होता हे समोर येईल. तरी घरगुती वादातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





