घरगुती भांडणाचा जोडप्याच्या मृत्यूने शेवट; निष्पाप चिमुकलाही मृत्यूच्या दारात

भंडारा – भांडणामुळे कोणाचेही चांगले होत नाही. भांडण कधी कधी मृत्यूलाही आमंत्रण देते. घरगुती भांडणामुळे पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा शहरातील कारधा येथे घडली. भाडणामुळे एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. तिला वाचवायला गेलेल्या पतीचाही मृत्यू झाला. तर 3 वर्षाचा चिमुकलाही होरपळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कारंधा पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघा शिंगाडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शिंगाडे यांचे घरात एकमेकांशी भांडण झाले. याचा राग आल्याने मेघा यांनी मध्यरात्री पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती शिंगाडे यांनी पत्नी मेघाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग जास्त असल्याने शिंगाडे यांनाही आगीने वेढा घातला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत 3 वर्षीय चिमुकल्यालाही भाजले आहे. त्याच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी कारधा पोलिस तपास करत आहेत.





