<p style="font-weight: 400;">चिखली (वार्ताहर) – चिखली येथील घरकुलमध्ये करोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रेशनही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. येथील तब्ब्ल पाच हजारांहून अधिक कुटुंबे ही दैनंदिन रोजगाराची कामे करून उदरनिर्वाह करीत होती. हातचे काम गेल्यामुळे येथील नागरिकांनी किमान रेशन तरी मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.</p> <p style="font-weight: 400;">यासंदर्भात फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष नारायण धुरी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रही पाठविले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, या भागातील रेशन माल देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. येथील अनेक कुटुंबे रोजंदारीची कामे करतात. याबाबत लवकर उपाययोजना न केल्यास त्यांच्या अडचणीमध्ये आणखी भर पडेल.</p> <p style="font-weight: 400;">महापालिकेच्या वतीने ही घरकुल योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत 140 सोसायट्या असून, पाच हजार 500 कुटुंब राहतात. कुटुंबे रोजंदारीची कामे करतात. अल्प उत्पन्न गटात मोडणारे हे रहिवासी आहेत. या भागात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना गहू, तांदूळ, डाळ यांसारख्या अन्नधान्यासाठी रेशनकार्डवर मिळणाऱ्या रेशनवर अवलंबून रहावे लागते. रेशनवर हे स्वस्त धान्य मिळत असल्याने त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. मात्र, चिखली येथील घरकुलमध्ये करोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रेशनही मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. आणखी काही दिवस हा परिसर बंद राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.</p> <p style="font-weight: 400;">त्यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच रेशनवर मिळणारे धान्य न मिळाल्यास त्यांना मोठा आर्थिक फटकाही बसणार असल्याने येथील नागरिकांसाठी रेशनचे धान्य देण्याची व्यवस्था करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.</p>