Sangli Politics : सांगलीत ठाकरे गटाला खिंडार; जिल्हा प्रमुखांसह शेकडो शिवसैनिक शिंदेसेनेत

Sangli Shivsena : सांगलीत उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी ठाकरे गटाची चिंता वाढवली आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जिल्हाप्रमुख संजय विभूते युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव आणि जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गट शिवसेनेमध्ये योग्य सन्मान मिळत नाही, त्याचबरोबर पक्ष वाढीकडे वरिष्ठांकडून कडून दुर्लक्ष करण्यात येत आहे, त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत पक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना संजय विभूते यांनी व्यक्त केली आहे. तर एकाच वेळी जिल्हा प्रमुखांसह, तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांचा शिवसेनेला सोडचिट्टी देण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.
कोण आहेत संजय विभूते?
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला संजयबापू विभूते यांच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक सन 2002 पासून शिवसेनेत सक्रिय झाला. सुरवातीच्या काळात शिवसेना शाखाप्रमुख नेवरी येथून सुरुवात केली. विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख त्यानंतर पुढे खानापूर तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने मानून खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांचे नेटवर्क तयार केले.
निर्भिड स्वभाव आणि धाडसी वृत्ती या गुणांच्या कौशल्यावर शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर लक्षवेधी आणि आक्रमक आंदोलने करून त्यांनी अल्पावधीतच सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे आक्रमक व धाडसी नेतृत्व म्हणून स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली. एक सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख ते थेट जिल्हाप्रमुख असा राजकीय प्रवास नेवरीसारख्या एका खेड्यातील संजयबापूंसारख्या नेत्याने केला आहे.
कोकणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
कोकणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.




