महाबळेश्वरमध्ये शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी करावी : डुडी

पाचगणी -महाबळेश्वर तालुक्यात होणारे अनधिकृत बांधकाम तसेच उत्खननावर सक्त कारवाई करणेत येईल. तसेच विनापरवाना वाणिज्य वापर होत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला. पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी 100 टक्के प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकाम, विनापरवाना वाणिज्य वापर तसेच बेकायदेशीर उत्खननावर आळा घालण्यासाठी महाबळेश्वर ग्रामस्तरावर संयुक्त समिती गठित केली. समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक व नगरपरिषद स्तरावर त्यांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये करण्यात येणारे बांधकाम व उत्खनन सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीमध्ये शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करताना प्लॅस्टिक बंदीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यात 100 टक्के प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी महसूल विभाग, नगरपालिका व वन विभाग यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही शहर व परिसरातील सर्व मोकळ्या जागांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी पार्किंग सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ. साबणे रोड सुशोभीकरणाबाबत नव्याने तयार केलेला पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण करून तेथील व्यापारी व नागरिकांची बैठक घेऊन सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात यावे, असे त्यांनी सूचित केले. नगरपालिका व हिलदारीच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या उपक्रमाबाबत घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केंद्र उभारण्यासाठीच्या सूचना डुडी यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.





