HMPV Virus : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा उद्रेक ; संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान

बीजिंगः २०१९ मध्ये कोरोना महामारीच्या विळख्याने संबंध जगाला हादरुन सोडले होते. या महामारीत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले होते. नंतरच्या काळात देखील कोरोनातून अनेक नव्या विषाणूंची उत्पती होत गेली. पुढे या महामारीने आक्राळाविक्राळ रुप धारण केले होते. भारतातही कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांना आपला जीव गमावावा लागला होता. या रोगाची सुरुवात चीन येथील वुहान प्रातांमधून झाली होती. आता गेल्या काही दिवसांमध्ये माध्यमातून मिळत असलेल्या माहितीनुसार वुहान शहरात आणखी एका विषाणूची लाट उसळताना दिसत आहे. या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) असे सांगण्यात येत आहे. यामुळे तेथील जनजीवन पूर्णताह विस्कळित झाले आहे.
हा विषाणू चीनमध्ये वेगाने पसरत असून दवाखाने आणि रुग्णालये तुडुंब भरली आहेत, असे सांगण्यात येत आहे. HMPV हा नवा व्हायरस वेगाने पसरत असल्याचा दावा अनेक अहवाल आणि सोशल मीडिया पोस्ट्समध्ये करण्यात आला आहे. या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून लोक या विषाणूला बळी पडल असल्याचे सांगण्यात आले आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी तेथील यंत्रणा कामाला लागली असून लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या विषाणुशी सामना करण्यासाठी तेथील रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
या विषाणूची लागण झाल्यावर नेमकं काय होतं ?
ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) या विषाणूची लागल झाल्यानंतर रुग्णाच्या शरिरात विविध स्वरुपाची लक्षणे दिसतात. यामध्ये सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास लागणे त्याचबरोबर दम लागले आदी लक्षणे दिसून येतात.





