Richa Chadha: ‘हनुमान अंश’ला मोठा प्रतिसाद; रिचा चड्ढा म्हणाली,”केवळ एका चित्रपटाच्या यशावरून…”
Richa Chadha: 'हनुमान अंश' चित्रपटाने ४०० कोटींचा पार केला टप्पा

Richa Chadha: ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला. अनेकांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. परंतु आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रिचा चड्ढा हिने मात्र या चित्रपटाबद्दल वेगळं मत मांडलं आहे. काही चित्रपट यशस्वी झाले म्हणजे मोठा ट्रेंड सुरू झाला आहे, असं होत नाही, असं ती स्पष्ट म्हणाली.
‘हनुमान अंश’च्या यशामुळे 2026 मध्ये प्रेक्षक मोठ्या बजेटपेक्षा चांगल्या कंटेंटला पसंती देत आहेत का, असा प्रश्न एका मुलाखतीदरम्यान रिचाला विचारण्यात आला होता. मात्र, तिने या मताशी पूर्णपणे सहमती दर्शवली नाही. केवळ एका चित्रपटाच्या यशावरून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झाला आहे, असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, असे तिने म्हंटले.
‘सकारात्मक घडतंय असं म्हणणं खूप घाईचं’
धार्मिक आणि पौराणिक विषयांना भारतात आधीपासूनच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे ‘हनुमान अंश’चं यश हे केवळ कंटेंटच्या विजयाचं उदाहरण म्हणून पाहण्याऐवजी त्याच्या धार्मिक आणि पौराणिक विषयाचाही विचार करायला हवा. अशा कथा पाहणं सुरक्षित मानलं जातं आणि लोक त्या पाहतात. मात्र यामुळे काहीतरी सकारात्मक घडतंय असं म्हणणं खूप घाईचं ठरेलं.
भारतीय चित्रपटाला खऱ्या अर्थाने कंटेंटच्या जोरावर यश मिळवणारा बनवायचं असेल तर मजबूत कथा आणि उत्तम स्क्रिप्टवर भर देणं आवश्यक आहे. लेखकांना चांगला मोबदला आणि योग्य संधी मिळाल्या पाहिजेत. चांगल्या स्क्रिप्टवर आधारित चित्रपट सातत्याने यशस्वी झाले, तरच भारतीय सिनेमात कंटेंटला प्राधान्य देण्याचा मोठा बदल झाल्याचं म्हणता येईल, असे मत तिने व्यक्त केले.
‘हनुमान अंश’बद्दल बोलायचे झाले तर, विशाल चतुर्वेदी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्यावर आधारित आहे, जो २०२६ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा:






