राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ; वर्षभरात तब्बल ‘इतक्या’ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई – अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गेल्या वर्षभरात विविध राज्यातून सुमारे 4 हजार 240 कोटी रूपयांहून अधिक अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत अमली पदार्थांची तस्करी आणि पदार्थांचे सेवन करणाऱ्या 17 हजार 857 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाल्याबाबत काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात फडणवीस यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. राज्यात अंमली पदार्थाच्या व्यापारास आणि प्रसारास आळा घालण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र ‘अंमली पदार्थ विरोधी कक्ष’ स्थापन केलेला आहे.
तसेच त्यासाठी स्टेट अॅपेक्स लेव्हल कमिटी आणि ‘अॅन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ची निर्मिती केली असून पोस्ट ऑफीस तसेच कुरीअर सेवा कंपन्यांच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या होणाऱ्या विक्रीस आळा घालण्याकरीता त्यांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करून त्यांना पाठविण्यात आली आहे.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दरवर्षी 26 जूनपासून 15 दिवस अंमली पदार्थ विरोधी पंधरवडा अभियान राबविले जात असून पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
मुंबई शहरामध्ये 1,153 गुन्हे दाखल
अंमली पदार्थ कायद्यांतर्गत मुंबई शहरामध्ये 2024 मध्ये एकूण 1 हजार 153 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 हजार 342 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांविरुद्ध 12 गुन्हे दाखल केले असून एकूण 13 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्याक्षेत्रामध्ये 2024 मध्ये आफ्रिकन नागरिकांविरुद्ध 21 गुन्हे व बांगलादेशी नागरिकांविरुद्ध 1 गुन्हा दाखल केलेला असून त्यामध्ये एकूण 56 आरोपींना अटक करण्यात आली आहे.





