HSRP Number Plate : राज्यातील वाहनधारकांना दिलासा ! उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता मुदतवाढ

मुंबई : राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तथापि, दिनांक 30.11.2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. तरी एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी 01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, मोठ्या संख्येने वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नव्हती. आता मुदत संपण्यास एका दिवसाचा कालावधी बाकी असतानाच राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.





