HSC Exam: इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका, प्रश्नाऐवजी छापले उत्तर, विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण?

HSC Exam : राज्यातील इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका आढळल्या आहेत. प्रश्नपत्रिकेत चुका असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले होते. सदर चूक बोर्डाच्या लक्षात आली असून आता विद्यार्थ्यांना गुणांची भरपाई दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 9 विभागांमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू आहेत.
सदर प्रश्नपत्रिकेतील 3 प्रश्नांमध्ये चुका आढळल्या आहेत. त्यापैकी एका प्रश्नात प्रश्नाऐवजी उत्तर देण्यात आले आहे तर दोन प्रश्नामध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्या आहेत. प्रश्नपत्रिका सोडविताना विद्यार्थी गोंधळात पडले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही बाब निरीक्षकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना ते प्रश्न तसेच सोडून देण्यास सांगण्यात आले. सदर तीनही प्रश्न हे दोन मार्कांना होते त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या तीन प्रश्नांचे 6 गुण मिळण्याची शक्यता आहे. ए सिरिजच्या प्रश्नक्रमांक 3,4, आणि 5 या प्रश्नांमध्ये या चुका आढळल्या आहेत.
सदर प्रश्नपत्रिकेतील चुकांविषयी बोर्डाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियमांची संयुक्त सभा पुन्हा एकदा आयोजित करण्यात येईल. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रश्नांचे 6 गुण विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.






