हरियाणात भाजपला सर्वाधिक जागा पण बहुमतापसून लांबच

नवी दिल्ली : हरियाणातून आलेल्या ताज्या बातम्यांनुसार त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना दिल्लीत निमंत्रित करण्यात आले आहे. 90 सदस्यांच्या विधानसभेर 75 जागा जिंकण्याचे लक्ष्य बाळगणाऱ्या भाजपाला केवळ 40 जागा मिळवता आल्या. तर कॉंग्रेस 3१ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे 10 जागांवर आघाडी घेणाऱ्या जननायक जनता पक्षाकडे सत्तेची चावी राहणार हे निश्चित झाले आहे.
माजी खासदार दुष्यंत चौटाला हे माजी केंद्रीय मंत्री विरेंदरसिंग यांच्या पत्नी प्रेमलाता यांच्यापेक्षा निर्णायक आघाडीवर आहेत तेच या सरकारचे किंगमेकर असतील असे चित्र आहे. दरम्यान, हरियाणातील जनतेला बदल हवा असून कोणताही पक्ष स्वत: सरकार बनवण्याच्या अवस्थेत नाही, असे चौटाला यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते कॉंग्रेसशी युती करतील अशी शक्यता आहे. सध्या तरी सरकार स्थापनेसाठी आमच्याशी कोणीही संपर्क साधला नाही. मात्र, उद्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या सभेत आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
सर्व एक्झीट पोलमध्ये भाजपा आरामदायक विजय मिळवेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. मात्र मतदारांनी हे अंदाज फोल ठरवले. भाजपा सत्तेत स्वबळावर येऊ शकत नाही हे स्पष्ट झाल्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बारला यांनी पदाचा राजिनामा दिला.
दरम्यान अद्याप बहुमतापासून पाच जागा कमी असणाऱ्या भाजपाला अँक्ष्मचि मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर दिल्लीला रवाना झाले आहेत.




