Punjab Election : पंजाबमध्ये ‘आप’चा लागणार कस; पोटनिवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला होणार जाहीर

Punjab Election – पंजाबमध्ये विधानसभेच्या ४ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. ती सत्तारूढ आपच्या लोकप्रियतेचा कस पाहणारी ठरणार आहे. पोटनिवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला (शनिवार) जाहीर होईल.
आपचा १ आणि कॉंग्रेसचे ३ असे मिळून ४ आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने विधानसभेच्या संबंधित जागा रिक्त झाल्या. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. ती आप, कॉंग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांसाठी मोठ्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे.
प्रामुख्याने सत्तारूढ आप आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दृष्टीने ती अतिशय महत्वाची आहे. काही महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपची कामगिरी सुमार ठरली. त्या पक्षाला पंजाबमधील लोकसभेच्या एकूण १३ पैकी केवळ ३ जागा जिंकता आल्या. त्यामुळे त्या पीछेहाटीचा शिक्का पुसण्याची संधी आपला पोटनिवडणुकीने मिळवून दिली आहे.
अर्थात, पोटनिवडणुकीचा निकाल प्रतिकूल ठरला तरी त्या पक्षाच्या सरकारच्या स्थैर्यावर कुठला परिणाम होणार नाही. मात्र, आप सरकारचा अडीच वर्षांचा म्हणजेच निम्मा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते सरकार आणि मान यांच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पोटनिवडणुकीकडे पाहिले जात आहे.





