Jatra 2 Movie : प्रेक्षकांची उत्सुकता किती ताणणार? 2022 ला जत्रा 2 ची केली होती घोषणा, आता क्रांती रेडकरने व्हिडीओ केला शेअर पण…

Jatra 2 Movie : दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या जत्रा या सिनेमाने मोठा इतिहास रचला. या सिनेमाला रिलीज होऊन आता १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. २०२२ पासून जत्रा २ लवकरच येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्यापर्यंत जत्रा २ सिनेमा कधी रिलीज होणार याविषयी कोणतीही माहिती आलेली नसतानाच या सिनेमात काम करणारी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जत्रा सिनेमातील कास्ट दिसत आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जत्रा २ कधी रिलीज होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर हिने तिच्या इंन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जत्रा सिनेमातील कलाकार डान्स करताना दिसत आहेत. या सिनेमातील अजरामर झालेलं कोंबडी पळाली या गाण्याची धून बॅकग्राऊंडला वाजत असून या धूनवर कलाकार मंडळी डान्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओत अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर डान्स करताना दिसत आहेत. तर व्हिडीओच्या शेवटी जत्रा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. लवकरच जत्रा २ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओला अभिनेत्री क्रांती रेडकर हिने लक्षवेधक कॅप्शन दिलं आहे. आमची छोटी जत्रा पुनर्मिलन !! आम्ही उर्वरित कलाकार आणि क्रू चुकलो. पण आज खूप हसलो.. सगल्या जुना आठवनी जाग्या झाल्या…. तुम्ही आमच्या पुढच्या सहकार्याची वाट पाहत आहात का?? असं तिने या म्हटलं आहे. यामुळे जत्रा २ सिनेमाची लवकरच रिलीज डेट जाहीर केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२२ मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवने जत्रा २ ची अधिकृत घोषणा केली होती. एक टीझरही त्याने सोशल मीडियावरून शेअर केला होता. यामुळे आता जत्रा २ कधी येणार यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
हेही वाचा : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला धक्का; बड्या नेत्याचा राजीनामा; काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती नाराजी





