‘या दोघींशिवाय मी शून्य…’, महिला दिनानिमित्ताने केदार शिंदेंची बायको-मुलीसाठी सुंदर पोस्ट

Kedar Shinde | दिग्दर्शक केदार शिंदे हे सध्या त्यांच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झळकणार आहे. यातच आता केदार शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने केदार शिंदे यांनी पत्नी बेला शिंदे आणि मुलगी सना शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या दोघींशिवाय मी शून्य आहे, असे म्हणत त्यांनी दोघींविषयी असलेल्या भावना शब्दात व्यक्त केल्या.
महिला दिनानिमित्ताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी लिहिले की, ‘आज जागतिक महिला दिन. प्रत्येकाच्या पुरूषाच्या आयुष्यात स्त्री ही अविभाज्य घटक असते. कारण जन्म देणारीच एक स्त्री असते. पुढे आयुष्यात अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात. आई पासून सुरूवात जरी झाली तरी, मावशी आत्या आजी काकू.. ते शाळा कॅालेजात शिक्षिका… पण पुन्हा एक वळण येतं जेव्हा लग्न होतं.’
View this post on Instagram
‘बेला माझ्या आयुष्यात येणं हा टर्निंग पॉइंट होता. मी एकांकिका स्पर्धेत धडपडणारा.. अचानक संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यावर, हातपाय मारू लागलो. माझ्या नाटक सिरीयल सिनेमाच्या प्रवासात अनेक चढउतार आले, येतायत, येतील.. खंबीरपणे साथ देणारी ‘ती‘ माझ्या सोबत आहे!’, असे लिहित केदार शिंदे यांनी पत्नीविषयी भावना व्यक्त केल्या.
त्यांनी पुढे लिहिले की, मुलीच्या रूपात आयुष्यात आली ‘ती सना.. तीने जबाबदारी सोबतच मॅच्युअर बनवलं. आज माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे सना. आजच्या टेक्नोलॉजी युगात अपग्रेड राहण्याचा मार्ग म्हणजे सना. या दोघी नसतील तर मी शुन्य आहे. मी 365 दिवस त्यामुळेच महिला दिन साजरा करतो, अशी सुंदर पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, केदार शिंदेंच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा सिनेमा 25 एप्रिल 2025 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत दिसेल.





