ही जुमले बाजी आणखी किती काळ? नोकर भरतीच्या घोषणेवर कॉंग्रेसचा सवाल

नवी दिल्ली – पुढील दीड वर्षात 10 लाख लोकांची भरती करण्याची जी घोषणा आज पंतप्रधानांकडून करण्यात आली आहे त्यावर कॉंग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. ही जुमले-बाजी आणखी किती दिवस सुरू राहणार असा सवाल कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की मोदींनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनानुसार गेल्या आठ वर्षांत 16 कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. आता ते 2024 पर्यंत फक्त 10 लाख नोकऱ्या देऊ असे सांगत आहेत. सरकारमध्ये साठ लाख पदे रिक्त आहेत. तीस लाख पदे केंद्र सरकारमध्ये रिक्त आहेत. नोकरभरतीची ही जुमले-बाजी आणखी किती दिवस चालणार आहे असा प्रश्न सुर्जेवाला यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
देशातील वाढत्या बेरोजगारीच्या संबंधात कॉंग्रेस व अन्य विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने पुढील दीड वर्षात दहा लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. देशातील एकूण बेरोजगारीच्या तुलनेत ही घोषणा केवळ दिशाभुल करणारी आहे असेही कॉंग्रेसचे म्हणणे आहे.





