आतापर्यंत भारतातून किती पाकिस्तानी नागरिक परतले? मुदतीच्या आत भारत सोडला नाही तर होणार कडक कारवाई?

Bharat Vs Pakistan | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊल उचलले आहे. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केले आणि त्यांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले होते.
त्यानुसार, भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असल्याचे जाहीर केले होते. ज्यानंतर अटारी सीमेवर पाकिस्तानात परतण्यासाठी लोकांची लांब रांग दिसून आली.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्यासाठी दिलेली मुदत काल 27 एप्रिल रोजी संपली आहे. अटारी सीमेवरील पंजाब पोलिसातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसात अटारी सीमेवरुन 531 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात गेले आहेत. तर याच काळात 843 भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.
भारतातून 24 एप्रिल रोजी 28 जण पाकिस्तानात परतले. 25 एप्रिल रोजी 191 जण, 26 एप्रिल रोजी 75 जण आणि 27 एप्रिल रोजी 237 जण पाकिस्तानात परतले. तर दुसरीकडे, पाकिस्तानातून 24 एप्रिल रोजी 105 जण भारतात आले. 25 एप्रिल रोजी 287, 26 एप्रिल रोजी 335 आणि 27 एप्रिल रोजी 116 जण भारतात आले. जे पाकिस्तानी निर्धारित वेळेत भारत सोडणार नाहीत, त्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते.
काय होऊ शकते शिक्षा?
अंतिम मुदतीनंतरही पाकिस्तानी नागरिक भारतात असल्यास त्याला अटक करून, त्याच्यावर खटला चालवला जाऊ शकतो. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अँक्ट २०२५ नुसार, निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ परदेशात राहणे, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश त्या व्यक्तीला या कायद्यान्वये शिक्षा होऊ शकते. या कायद्यान्वये दिलेला कोणताही नियम किंवा आदेश तसेच या कायद्याच्या इतर कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केल्यास, ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा ३ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोनवरून कडक सूचना दिल्या होत्या. पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडण्यासाठी दिलेल्या निर्धारित वेळेत भारतातून निघून जावे, कोणालाही त्यापेक्षा जास्त काळ भारतात राहू दिले जाऊ नये याची खात्री करण्यास सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले गेले होते.
दरम्यानम सार्क व्हिसाधारकांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते, तर वैद्यकीय व्हिसा धारकांना २९ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर या तारखेच्या आत पाक नागरिक मायदेशी रवाना झाले नाही तर त्यांना बेकायदा ठरवून त्यांच्या खटला दाखल होणार आहे.
हेही वाचा:





