मुंबई – भारतीय जनता पक्ष कोणत्याही पद्धतीने उमेदवारी देताना जातीचा विचार करत नाही. उमेदवार हा त्याच्या क्षमतेवर ठरत असतो. मतदारसंघातील जनतेचे मत काय आहे? तेथील कार्यकर्त्यांचे मत काय आहे? यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे समाज म्हणून कोणताही निर्णय करण्यापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वावर निर्णय केला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उमेदवाराच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेतो. त्यामुळे त्याबाबत मी बोलणे योग्य होणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत – महायुतीच्या जागावाटपाबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये 90% जागांवर एकमत झाले आहे. केवळ दहा टक्के जागांवर एकमत होणे बाकी आहे. ते देखील लवकरच होईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अशा अनेक योजनांना केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महाराष्ट्राचे नुकसान – भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही आली, तर ते केंद्र सरकारची मदत घेणार नाहीत. केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार असले तरी देखील ते मदत घेणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्राचे नुकसान करतील. त्यामुळे युतीचेच सरकार चांगले काम करणार आहे. …तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत – बावनकुळे म्हणाले, एखाद्या मतदारसंघातून दोन उमेदवारी इच्छुक असतील आणि दोघांनी उमेदवारी मागितली, तर त्याला बंडखोरी म्हणत नाहीत. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर कोणी विधानसभा निवडणूक लढवत असेल, तरच त्याला बंडखोरी म्हटले जाते. त्यामुळे एका मतदारसंघात जास्त इच्छुक असणे, ही बंडखोरी नाही. भाजप उमेदवारांची पहिली यादी आज – भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीतील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. जागा वाटपावर चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिली.