Somnath Suryavanshi : पोलिस कोठडीत अखेरचा श्वास घेणाऱ्या ‘सूर्यवंशी’चा मृत्यू नेमका कसा झाला? शवविच्छेदन अहवाल समोर…

Somnath Suryavanshi – परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अर्थात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परिणामी, आंबेडकरी अनुयायांत संतापाची तीव्र लाट उसळली आहे. परभणी शहरात गत आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती.
या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम ऑन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे.
त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.
प्रकाश आंबेडकर परभणीत ठाण मांडून :
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या न्यायासाठी लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी त्यांनी स्थानिक गेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. त्यात त्यांना पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती देण्यात आली. त्याचे अनेक व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले.





