चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसे कळाले? सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले
Supreme Court | Rahul Gandhi – लष्करावर केलेल्या टिप्पणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फटकारले. चीनने भारताची जमीन बळकावली आहे हे तुम्हाला कसे कळले? तुमच्या माहितीचा विश्वसनीय स्रोत कोणता आहे अशी विचारणा न्यायालयाने राहुल यांना केली आहे. तसेच तुम्ही खरे भारतीय असाल तर अशा गोष्टी बोलणार नाहीत असेही न्यायालयाने त्यांना म्हटले.
राहुल यांनी २०१४ पासून आतापर्यंत अशी अनेक विधाने केली आहेत, ज्यामुळे त्यांना न्यायालयात जावे लागले आहे. त्यांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी कारगिलमध्ये भारत जोडो यात्रे दरम्यान एका रॅलीला संबोधित केले. गलवानमध्ये चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीचा संदर्भ देत, राहुल गांधींनी रॅलीत दावा केला होता की भारत जोडो यात्रेबद्दल लोक काही पण विचारतील, पण चिनी सैनिकांनी आपल्या सैनिकांना मारहाण केल्याबद्दल एकही प्रश्न विचारणार नाहीत. चीनने २००० चौरस किलोमीटर भारतीय भूमीवर कब्जा केला आहे.
चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या बेजबाबदार विधानावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असते तेव्हा विरोधी पक्षनेत्याने असे विधान करायला नको होते. जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही हे म्हटले नसते. जेव्हा सीमेपलीकडे वाद असतो, तेव्हा तुम्ही हे सर्व म्हणू शकता का? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारू शकत नाही? तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी, एक खरे भारतीय म्हणून तुम्ही सैन्याबद्दल अशी टिप्पणी करावी का? तुम्ही एक जबाबदार नेते आहात.
यावर राहुल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, जर राहुल विरोधी पक्षनेते म्हणून हे सर्व सांगू शकत नसतील, तर काय फायदा? त्यावर त्यांना उत्तर देताना न्यायालयाने सांगितले की राहुल हे प्रश्न संसदेत का उपस्थित करत नाहीत? सोशल मीडियावर का टिप्पणी करतात? दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांना दिलासाही दिला. त्यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती दिली.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान भारतीय सैन्याबद्दल ही टिप्पणी केली होती, ज्यासाठी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासाही दिला. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, चीनने २००० चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे हे तुम्हाला कसे कळले? विश्वसनीय माहिती काय आहे?
दरम्यान, २०२० मध्ये चीनने पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात सरावाच्या बहाण्याने मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले होते. त्यानंतर सीमेवर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या. प्रत्युत्तर म्हणून, भारत सरकारनेही या भागात चीनइतकेच सैनिक तैनात केले. परिस्थिती बिघडतच राहिली. अखेर १५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी चकमक झाली, ज्यामध्ये २० भारतीय सैनिक शहीद झाले आणि ४० चिनी सैनिक मारले गेले.





