ICC Champions Trophy : अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार का? जाणून घ्या समीकरण

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा होता. या अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लड सारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीची गणिते पूर्णपणे बदलली आहेत. या सामन्यानंतर इंग्लड स्पर्धेबाहेर गेला.
या विजयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी ब गटातील तीन संघांमध्ये थेट स्पर्धा आहे. इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवून अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पुढील सामन्यात अफगाणिस्तान संघाचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होईल. जर अफगाण संघाने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी होणारा सामना या दोन्ही संघासाठी करो या मरो असणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड 1 मार्च रोजी आमनेसामने येतील. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. जर अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला तर दक्षिण आफ्रिका शेवटच्या सामन्यापूर्वी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 3 गुण आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या अफगाणिस्तानचे फक्त 2 गुण आहेत. त्यामुळे जर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल. जर ते हरले तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
तर दुसरीकडे ब गटातून भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे या दोन्ही संघात 2 फेब्रुवारीला होणारा सामना औपचारिक असणार आहे. या सामन्यातील जय पराजयाने दोन्ही संघांना काही फरक पडणार नाही मात्र हे दोन संघ अव्वल स्थानी राहण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे आता या अ गटातून दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यांमधील कोणता संघ उपांत्य फेरी गाठतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





