Nagar | निघोज परिसरात ड्रोनच्या घिरट्या ; जनतेमध्ये पसरली घबराट

निघोज, (वार्ताहर)- निघोज आणि परिसरातील गावांत तसेच वाडी-वस्तीवर दि. १६ रोजी रात्री दहा ते एकच्या दरम्यान ड्रोनच्या मोठ्या प्रमाणात घिरट्या वाढल्याने जनतेमध्ये घबराट पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने याचा खुलासा करीत जनतेच्या मनातील भिती दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. मंगळवार दि.१६ रोजी रात्री निघोज, गाडीलगाव, गुणोरे, देवीभोयरे,
वडगाव गुंड, मोरवाडी, भांबरेमळा, रसाळवाडी, ढवणवाडी, वडनेर या परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत ड्रोन मोठ्या संख्येने आकाशात घिरट्या घालत आहेत. याबाबत शेजारील पुणे जिल्ह्यातील वडनेर, टाकळी हाजी, माळवाडी, भाकरेवाडी या परिसरात सुद्धा गेली अनेक दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत आहेत.
याबाबत तेथील जनतेने वेळोवेळी पोलीस व तहसील प्रशासन यांना कळविले आहे. मात्र, आजपर्यंत कोणीही या ड्रोनची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे हे ड्रोन सातत्याने या परिसरात लोकांचे लक्ष वेधत आहे. राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी ड्रोन पकडण्यासाठी ड्रोनगणचा वापर करण्यात येणार असून,
याबाबत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन यासाठी पंधरा लाख रुपयांची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हाच प्रकार सातत्याने नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तसेच इतर तालुक्यातील गावात सातत्याने होत आहे. निघोज परिसरात तर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे ड्रोन राजरोसपणे फिरत होते. याचा शोध घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.





