Houthis target Saudi : सौदीच्या तेल प्रकल्पावर हौथींचा हल्ला.! आखातातील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता
सौदी अरेबियाने येमेनच्या हवाई हद्दीचा भंग करून हाज्जाह आणि सादा प्रांतांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे हौथींनी म्हटले आहे.

Houthis target Saudi : सौदी अरेबियाच्या नैऋत्येकडील एका तेल प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा येमेनमधील हौथी बंडखोरांनी केला आहे. जेझान शहरातल्या आरामको या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला करण्यात आला, असे हौथींचा प्रवक्ता याह्या सारी याने म्हटले आहे. सौदी अरेबियाने येमेनच्या हवाई हद्दीचा भंग करून हाज्जाह आणि सादा प्रांतांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे हौथींनी म्हटले आहे.
अरामको तेल शुद्धिकरण प्रकल्पाला आणि लाल समुद्रातल्या जहाजाला रविवारी सकाळी आग लागल्याचे सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले. याघटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही स्पष्ट केले गेले. जहाजाला लागलेली आग नंतर विझवण्यात आली. पण या आगीमागचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. लाल समुद्रातील महत्वाच्या बंदरावरही हौथींनी हल्ला केल्याचे येमेन सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हौथींनी मोचा बंदरावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले, असे माहिती मंत्रालयाचे सहायक उपसचिव, फयेद अल-नोमान म्हणाले. मोचा हे येमेनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारच्या अखत्यारीतील मुख्य बंदरांपैकी एक आहे, होदेदामधील हौथींच्या ताब्यातील बंदरे टाळणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीची हाताळणी करता यावे म्हणून या बंदराचे अलिकडच्या वर्षांत नूतनीकरण करण्यात आले आहे.
या बंदरावरील हल्ल्याबाबत हौथींकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. हौथींकडून लाल समुद्रातल्या जहाजांवर आणि सौदी अरेबियावर सतत केल्या जात असलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या शृंखलेतील रविवारी झालेला हल्ला हा सर्वात अलिकडचा हल्ला आहे. मात्र हौथींच्या या हल्ल्यांमुळे येमेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून स्थगित झालेला यादवी संघर्ष पुन्हा सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेकडून नव्या हल्ल्यांची तयारी
होर्मुझ खुली करण्याबाबतची अट अमेरिकेने मान्य केली असली तरीअद्याप त्याबाबत काही टिप्पणी केलेली नाही. जूनमधील हंगामी युद्धविरामानुसार भरपाई, निर्बंध हटवण्याचे वेळापत्रक आणि नुकसान भरपाईबाबत चर्चेद्वारे निर्णय घेतला जाणार आहे.
शनिवारपर्यंत अमेरिकेने केलेल्या इराणच्या नाकेबंदीमुळे ५३ व्यापारी जहाजे वळवण्यात आली आहेत, दोन जहाजे निकामी करण्यात आली आहेत आणि दोन जहाजांवर चढाई करण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
अमेरिकेकडून इराणवरील संभाव्य वाढीव हल्ल्यांची तयारीही केली जाते आहे. अमेरिकेतल्या संरक्षण उद्योगांनी आपले उत्पादन वाढवावे, यासाठी पेंटागॉनकडूनया उद्योगांवर दबाव आणला जातो आहे. किमान होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी हंगामी करार लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.
या कराराला गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या सदस्यांनी पाठिंबा दिला असून, तो अंतिम झाल्यावर इराण, ओमान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय सागरी संघटना यांच्याकडून संयुक्तपणे जाहीर केला जाण्याची अपेक्षा आहे.
इराणच्या नवीन अटी
दरम्यान इराणने अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी काही नव्या अटी समोर ठेवल्या आहेत. मध्यस्थांच्या माध्यमातून या नवीन अटी मांडण्यात आल्या असल्याचे इराणचेपरराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले.
जोपर्यंत सामंजस्य कराराचे उल्लंघन थांबवले जात नाही, तोपर्यंत वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. होर्मुझच्या सामुद्रधनीच्या व्यवस्थापनाबाबत ओमानबरोबरची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहेत. मात्र याचा अर्थ आता होर्मुझची सामुद्रधुवनी उघडली जाईल, असा नाही. हा मार्ग उघडला जाणे इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.
अमेरिकेने आपल्या वर्तनात दुरुस्ती केल्याशिवाय ही सामुद्रधुनी उघडली जाणार नाही, असे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. इराणला भविष्यात धमकावले जाता कामा नये.
इराण आणि इराणच्या सहयोगी गटांविरुद्धचे युद्ध कायमस्वरुपी थांबवले जायला हवे आणि आतापर्यंतच्या युद्धातील नुकसानीची भरपाई इराणला द्यायला हवी. इराणवरील सर्व निर्बंध हटवले जायला हवे आणि गोठवलेला निधी पुन्हा परत मिळण्याबाबत चर्चा व्हायला हवी, असे इराणने म्हटले आहे.





