satara | लोणचे बनवण्यासाठी गृहिणींची लगबग

पुसेगाव, (प्रतिनिधी)- वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वी लोणचे बनविण्यासाठी गृहणींची लगबग सुरू झाली आहे. दिवसेंदिवस गावरान आम्रवृक्षांची कत्तल होत आहे. कमी कालावधीत येणाऱ्या कलमी आंब्याकडे सर्वांचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैऱ्याची आवक जेमतेम आहे. त्यामुळे त्यांचे भाव दामदुप्पट झाल्याने लोणच्यासाठी गावरान कैऱ्या आंबट झाल्याचे चित्र आठवडे बाजारात पहावयास मिळत आहे.
पूर्वीच्या काळी सर्वांच्या पसंतीला उतरलेली गावरान आंब्यांची झाडे वृक्षतोडीमुळे दृष्टीआड झाली. त्यातही थोडेफार असलेल्या झाडांचा लगडलेला मोहोर ढगाळ वातावरण व उन्हाच्या प्रखरतेमुळे झडून झाडांस जेमतेम कैऱ्या लगडल्या आहेत. पंधरा- वीस दिवसांपासून अधूनमधून दररोज वादळी वारा सुटत असल्याने परिपक्वतेपूर्वीच फळगळती होत असल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.
अनेक आंबा उत्पादक ग्राहकांची लोणच्याला असलेली पसंती लक्षात घेऊन गावरान कैऱ्या आठवडे बाजारात विक्रीस आणत आहे. दरवर्षी ३०० रुपये शेकडा मिळणाऱ्या लोणच्यासाठीच्या कैऱ्या यंदा ७०० ते ८०० रुपये शेकडा तर प्रति ४० रुपये किलोप्रमाणे बाजारात विकल्या जात आहे.
परिणामी, यंदा लोणच्याची चवच महागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कैरी दुप्पटीने म्हणजे जवळपास ५ ते ६ रुपये प्रती नग झाली आहे. एवढेच नव्हे तर लोणचे मसाल्याचे दरही आकाशाला भिडले आहेत. ग्रामीण व शहरी भागात पावसाळा व हिवाळा ऋतुत दररोजच्या भोजनासोबत आंब्याच्या लोणच्याचा सर्रास वापर केला जातो.
भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी लोणच्यावर विशेष भर दिला जातो. शेतावर जाणारे मजूर, कामगार, कष्टकरी भाकरी ठेच्यासोबत लोणच्यास विशेष पसंती देतात. लोणचे साठविण्यासाठी चिनी माती व काचेच्या बरण्या खरेदी केल्या जात आहेत. कैऱ्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने गृहिणींचा घरगुती हिशेब कोलमडला आहे.
कैऱ्या फोडणाऱ्यांना सुगीचे दिवस
लोणचे टाकण्यापूर्वी कैऱ्या फोडणे अनिवार्य असल्याने पन्नास रुपये शेकड्याप्रमाणे कैरीच्या फोडी करून घ्याव्या लागत आहे. त्यामुळे कैऱ्या फोडणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. लोणच्यासाठी मीठ, मोहरी, हळद, तेल, लसूण, मिरे, लवंग, मेथी, तीळ, हिंग आदी वस्तू लागतात. मात्र, त्यांचेही दर वाढल्याने एकूणच लोणचे महाग झाल्याचे चित्र आहे. परंतु, हा सर्व प्रकार बघता यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून व्यापारी, आठवडे बाजार करणारे यांना यातून आर्थिक लाभ होत आहे.





