House sales: घरांच्या विक्रीत फक्त १% वाढ; महागड्या घरांची मागणी घटली, परवडणाऱ्या घरांकडे कल

नवी दिल्ली – दुसर्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशातील आठ मोठ्या शहरांत घर विक्री एक टक्क्याने वाढली. ही आकडेवारी संकलित करणार्या नाईट फ्रँक या संस्थेने म्हटले आहे की, महागड्या घरांच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विकसकांनी किफायतशीर घर निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येते.
करोनामध्ये मंदावलेली घर विक्री करोनानंतर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता या विक्रीचा शिखर बिंदू आला असण्याची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. दुसर्या तिमाहीत आठ मोठ्या शहरात घर विक्री एक टक्क्याने वाढून 87,603 युनिट झाली आहे. कमी झालेले व्याजदर, 7.6% असलेला विकासदर आणि प्राप्ती कर ऊत्प्पन्न मर्यादेत झालेली वाढ या कारणामुळे दुसर्या तिमाहीत घर विक्री वाढण्यास मदत झाली. जीएसटी दर कपातीची अंमलबजावणी 22 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम या आकडेवारीत दिसून आलेला नाही.
नाईट फ्रँक या संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, सलग पाचव्या वर्षात घर विक्रीची आकडेवारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आगामी काळात ही विक्री काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता वाढली आहे. व्याजदरात झालेली एक टक्का कपात, प्राप्त करून उत्पन्न मर्यादित झालेली वाढ, जीएसटी कपातीची झालेली घोषणा या कारणामुळे ज्यांना घर हवे आहे ते नागरिक घर खरेदी करण्याचा विचार करीत आहेत.
दुसर्या तिमाहीच्या सुरुवातीला घर विक्री स्थिरावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षामध्ये ही विक्री एक टक्क्याने वाढली आहे. आकडेवारीचे विश्लेषण केले असता असे दिसून येते की, आतापर्यंत महागड्या घरांची निर्मिती वाढली होती. त्याचबरोबर या घरांची मागणी कायम होती. मात्र दुसर्या तिमाहित ही विक्री मंदावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकसकांनी आता किफायतशीर घर निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
8 महिन्यात घर विक्री कमी –
गेल्या पाच वर्षात अगोदरच बरीच खरेदी झाली आहे. त्यामुळे खरेदीचा वेग काही प्रमाणात कमी होऊ शकतो. किंबहुना आठ शहरात पहिल्या नऊ महिन्यांमध्ये झालेली विक्री एक टक्क्याने कमी होऊन 2,57,804 युनिट इतकी झाली आहे. ज्या शहरांचा या आकडेवारीसाठी विचार करण्यात आला आहे त्यामध्ये पुणे, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बंगळूरू, कोलकत्ता, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे.


