धाराशिव : मागच्या काही महिन्यांपासून या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासोबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे काल सायंकाळी अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. अज्ञात कारमधून आलेल्या पाच आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याला मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी त्याला तब्बल पाच किलोमीटर कारला लटकावून नेलं आणि त्यानंतर एका पुलावर फेकून दिलं.मारहाणीत जखमी झालेल्या हॉटेल मालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉटेल मालकाने सांगितला सगळा घटनाक्रम हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सांगितली की, बुधवारी सायंकाळी हॉटेलवर बरेच लोक जेवायला आले होते. तेव्हा तिथे कारमधून आलेल्या पाच लोकांनी मला सेल्फी काढायची असल्याचं सांगितलं. मी सेल्फी काढण्यासाठी कारच्या खिडकीजवळ गेलो. तेव्हा त्यांनी मला आत ओढून काच बंद केली. लगेच गिअर टाकून १४० च्या स्पीडने कार पळवली. डोळ्याच्या वरच्या बाजुला बुक्की घातली. अपहरण केल्यानंतर अपहरणकर्ते ‘याला मारून टाकू’ असं म्हणत होते. याचे हात जोपर्यंत तुटत नाहीत, जोपर्यंत हा मरत नाही, तोपर्यंत याला सोडायचं नाही, असंही आरोपी म्हणत असल्याचा दावा मडके यांनी केला. तसेच ‘याला जामखेडपर्यंत न्यायचं, मारून पुलात टाकायचं, असे देखील आरोपी म्हणाल्याचे मडके यांनी सांगितले. बुधवारी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. पाच किलोमीटर फरपटत नेलं आणि वडगावच्या पुलावर फेकून दिलं. मला मारायच्या उद्देशानेच त्यांनी उचलून नेलं होतं. जीवे मारण्यासाठीच त्यांनी मला बुक्क्या मारल्या असेदेखील मडके यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा हॉटेलवर तैनात केलेले बाऊन्सर त्याच ठिकाणी होते असे असतानादेखील मडके याचे अपहरण करण्यात आले. एवढचं नाहीतर मागच्या आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणासाठी लोकांची गर्दी असते. त्यामुळे या हॉटेलमध्ये सध्या बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील हॉटेलच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.