Hospital Fire Safety: रुग्णांचा जीव धोक्यात! वायसीएम आणि औंध जिल्हा रुग्णालयाकडेच ‘फायर एनओसी’ नाही
Hospital Fire Safety: पिंपरी-चिंचवडमधील ७५० पैकी तब्बल ४८५ रुग्णालयांकडे अग्निशामक दलाची अंतिम एनओसी नाही; वायसीएम व औंध जिल्हा रुग्णालयासारख्या मोठ्या केंद्रांतही सुरक्षेचा गंभीर प्रश्न.

Hospital Fire Safety – रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णालयांमध्येच अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नवी सांगवी येथील औंध उरो जिल्हा रुग्णालयाकडे अद्याप अग्निशामक दलाचे अंतिम ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दोन्ही रुग्णालयांत दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेतात. त्यामुळे अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वायसीएम रुग्णालयाची क्षमता सुमारे ७०० खाटांची आहे. तसेच येथील ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) येथे कायम रुग्णांची गर्दी असते. मात्र, रुग्णालयाने अद्याप फायर एनओसी घेतलेली नाही. रुग्णालयातील ‘रुबी एलकेअर’ या खासगी विभागाकडे मात्र एनओसी असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी सांगवीतील औंध उरो जिल्हा रुग्णालयाची क्षमता सुमारे ४५० खाटांची आहे. या रुग्णालयाच्याही ओपीडीमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयानेही फायर एनओसी घेतलेली नाही. नुकत्याच झालेल्या फायर ऑडिटमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणेत काही त्रुटी आढळल्या आहेत. दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयांची एकूण संख्या सुमारे ७५० आहे.
त्यापैकी केवळ २६५ रुग्णालयांनी फायर एनओसी घेतली आहे. हे प्रमाण सुमारे ३५.३ टक्के आहे. उर्वरित ४८५ रुग्णालयांकडे एनओसी नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. हे प्रमाण सुमारे ६४.७ टक्के आहे. रुग्णालयांमध्ये अग्निशामक यंत्रणा, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकलर, पाण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग आवश्यक आहे.
विशेषतः आयसीयू आणि गंभीर रुग्णांच्या विभागात सुरक्षेला अधिक महत्त्व आहे. अग्निसुरक्षेतील त्रुटी वेळीच दूर न झाल्यास दुर्घटनेच्या वेळी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एनओसी नसलेल्या रुग्णालयांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आयुक्त बदलल्यावर आदेश बासनात?
ज्या रुग्णालयांकडे फायर एनओसी नाही त्यांचे रुग्णालय प्रमाणपत्र नुतनीकरण करू नका, असे आदेश माजी आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकिय विभागाला दिले होते. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी वैद्यकिय आणि अग्निशामक विभाग यांनी समन्वयाने काम करण्यास सांगितले होते. मात्र आयुक्त बदलल्यानंतर त्यांचे आदेश बासनात गुंडाळण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.
दोन्ही रुग्णालयांनी एनओसी घेतलेली नाही..
“औंध उरो जिल्हा रुग्णालय आणि वायसीएम रुग्णालयाने आतापर्यंत अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा झाली आहे. लवकरच ऑनलाइन अर्ज करून एनओसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले आहे. औंध उरो रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाला देण्यात येईल.”
– व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, अग्निशामक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका






