Akluj : देशपातळीवरील अकलूज येथील घोडेबाजार तेजीत
Akluj : महाराष्ट्रातील सर्वाधिक शास्त्रशुद्ध आणि नियोजनबद्ध घोडेबाजार म्हणून अकलूजची ओळख आहे. या बाजारात उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि हरियाणा या राज्यांतून व्यापारी दाखल झाले आहेत.

अकलूज : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २००९ मध्ये सुरू केलेला घोडेबाजार आज केवळ खरेदी-विक्रीचे केंद्र राहिले नसून, ती एक भक्कम ग्रामीण आर्थिक व्यवस्था बनली आहे. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेला हा बाजार दत्त जयंतीपर्यंत अव्याहतपणे सुरू राहतो. दुष्काळाचे सावट असतानाही यंदा घोडे शौकिनांकडून या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १, १८० घोड्यांची आवक व २७९ घोड्यांची विक्री होऊन ३ कोटी २० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक शास्त्रशुद्ध आणि नियोजनबद्ध घोडेबाजार म्हणून अकलूजची ओळख आहे. या बाजारात उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि हरियाणा या राज्यांतून व्यापारी दाखल झाले आहेत. मारवाडी, काठियावाडी, नुकरा, पंजाबी/थोरोब्रेड आणि सिंधी या जातींचे शर्यतीचे, नृत्य करणारे तसेच लग्न समारंभ व पर्यटनासाठी लागणारे विविध रंगांचे देखणे घोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील या बाजारामुळे अकलूज परिसरातील पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना मिळाली आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही व्यापारी खरेदीसाठी येतात. परराज्यातील व्यापारी आणि शौकिनांच्या मुक्कामामुळे स्थानिक हॉटेल, लॉज, वाहतूक (ट्रान्सपोर्ट) आणि चारा विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे. याशिवाय घोड्यांना चाल व नृत्य शिकवणारे प्रशिक्षक (ट्रेनर), हलगीवादक कलाकार आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
घोडे साहित्याचा भव्य बाजार
बाजारात घोड्यांसोबतच त्यांना लागणाऱ्या सजावटीच्या आणि दैनंदिन साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये नक्षीकाम केलेले खोगीर, जीन, वेस्टर्न सॅडल, सपाट, म्होरकी, गादी, शोल्डर, आंधेरी, बागरसी, चाळ, खरारा, आंब्रश, वायपर, हाथेली, गोंडे, ओढणी, बँडेज, कॅन्डल बूट, आकर्षक रंगबेरंगी झुली, बेअरिंग, लगाम, लाइटच्या माळा, नालबंदीचे साहित्य, सुती कंडे आणि आधुनिक डिझाइनचे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे खरेदीदारांना सर्व साहित्य एकाच छताखाली मिळत आहे.
प्रशासनाचे चोख नियोजन
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे संचालक मंडळ, सचिव राजेंद्र काकडे, प्रशासकीय अधिकारी ॲड. धनंजयराव देशमुख व कर्मचाऱ्यांनी या बाजाराचे अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक नियोजन केले आहे. व्यापाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे.
देशात आदर्श ठरणारे पायाभूत सुविधा मॉडेल –
बाजार समितीने घोडेबाजारासाठी निर्माण केलेल्या सुविधा देशभरात आदर्श ठरत आहेत:
एक हजार झाडांची घनदाट सावली व सुरक्षित तटबंदीसह एकच मुख्य प्रवेशद्वार
सुसज्ज अंतर्गत रस्ते, पार्किंग व्यवस्था, स्वागत कक्ष व माहिती केंद्र
पिण्याच्या पाण्याची सोय व घोडे धुण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी
नियमित निर्जंतुकीकरण फवारणी व घोड्यांच्या आकर्षक स्पर्धा
खरेदीदार, विक्रेता व घोड्याच्या छायाचित्रासह संगणकीकृत पावती प्रणाली
बाजार आवारात प्रकाशयोजना, ध्वनिक्षेपक व प्रशिक्षणासाठी अनुभवी ट्रेनरची उपलब्धता





