Pune-Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात! चार जणांचा दुर्दैवी अंत, दोघे गंभीर जखमी
Pune-Satara Highway Accident : एका हॅाटेल समोर अपघात घडला असून सारोळा महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून हटवून वाहतूक सुरळीत केली.

Pune-Satara Highway Accident : पुणे -सातारा महामार्गावर शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कार डिवायडरला धडकून पलटली व विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचुर झाला आहे.
भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. एका हॅाटेल समोर अपघात घडला असून सारोळा महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्यातून हटवून वाहतूक सुरळीत केली.
शिरवळ पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. अपघातग्रस्त टाटा नेक्सॉन कारमधील चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी मृत तरुणांची नावं आहेत. मयत चारही जण तळेगाव दाभाडे आणि मावळ भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर जखमींना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
यामुळे होताहेत अपघात
या महामार्गावर सातत्याने अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अपघात वाढण्याची नेमकी कारण काय आहेत. हे जाणून घेऊयात. घालून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेग, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, अचानक लेन बदलताना मागून येणाऱ्या वाहनाची धडक, मोबाइल सुरु असताना कार चालवणे, मद्यप्राशन करुन ड्रायव्हिंग करणे अशी अपघाताची ठराविक कारणं आहेत. याशिवाय अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सुद्धा कमी नाही.





