Pune-Satara highway Accident: पुणे-सातारा महामार्गावर कात्रज येथील जांभुळवाडी बोगद्याजवळ आज एक काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात झाला. एका भरधाव डंपरने ४ ते ५ वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर डंपरने अचानक पेट घेतला, ज्यामध्ये डंपर जळून खाक झाला आहे. या घटनेत ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरून जात असताना जांभुळवाडी बोगद्याजवळ चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. नियंत्रणाबाहेर गेलेल्या या डंपरने समोर असलेल्या चार ते पाच वाहनांना अक्षरशः उडवले. धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर काही वेळातच डंपरला आग लागली. आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर उपचार सुरू – या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातील ४ ते ५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. ‘डेथ ट्रॅप’ ठरतोय महामार्ग; प्रवाशांमध्ये संताप – जांभूळवाडी बोगदा, नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज हा पट्टा आता अपघातांचे केंद्र बनला आहे. काही दिवसांपूर्वीच नवले ब्रिजवर कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला होता. या भागात रोजच छोटे-मोठे अपघात होत असतानाही प्रशासन कोणतीही ठोस पाऊल उचलत नसल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिस अधिक तपास करत आहेत.