Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार; दोन चिमुरड्यांसह चालक गंभीर
Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमधील दोन लहान मुले आणि चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे पत्नी गुलसितान बी आणि कुटुंबीयांसह नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे फॉर्च्यूनर कारने जात होते. समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळ भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, डॉ. सय्यद आसिफ आणि त्यांच्या पत्नी गुलसितान बी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कारचा चालक तसेच दोन लहान मुले गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबईतही पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात घडला. बोरिवली येथील देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ भरधाव टेम्पोने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसत पाच ते सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





