Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! दोघांचा जागीच मृत्यू; पाच जण जखमी, यवतजवळील घटना

Accident News : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत परिसरात भीषण अपघात झाला आहे. दोन कार एकमेकांना समोरासमोर धडून हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
अपघात कसा घडला?
या अपघाताची माहिती यवत पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मारुती भोसले (रा. बोरीभडक, ता. दौंड) हा आपल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (क्र. एम.एच. १२ व्ही. ५०१२) निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन चालवत होता. यावेळी त्याने वाहन नियमांचे उल्लंघन करत उरुळी कांचनकडे जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला (क्र. एम.एच. १२ टी वाय ७९३१) जोरदार धडक दिली.
या धडकेत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले (वय ५०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) आणि गणेश दोरगे (वय २८, रा. यवत, ता. दौंड) या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिसांनी ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश मारुती भोसले यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





