Accident News : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी
Accident News : या धडकेत वॅगनारमधील ज्ञानदेव गणपती दळवी यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

भोर : पुणे-सातारा महामार्गावरील हरिचंद्री गावच्या हद्दीत ब्रिज सुरू होतो त्या ठिकाणी सर्विस रोडवर पहाटेच्या सुमारास दोन वाहनांची भीषण धडक झाली. या अपघातात ६५ वर्षीय ज्ञानदेव गणपती दळवी यांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (४ सप्टेंबर) रोजी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास निलेश पांडुरंग पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह मारुती वॅगनारमधून सिद्धनाथ म्हसोबा देवदर्शनासाठी जात होते. त्यांची गाडी हरिचंद्री गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावरील सर्विस रोडवरून जात असताना पाठीमागून आलेल्या जीपने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या धडकेत वॅगनारमधील ज्ञानदेव गणपती दळवी यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच वाहनचालक निलेश पांडुरंग पाटील यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघातात प्रिया अमोल दळवी (वय १०) हिच्या उजव्या हाताला, दृष्टी अमोल दळवी (वय ७) हिच्या डाव्या पायाला, तर शारदा ज्ञानदेव दळवी (वय ५५) यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जीप चालक प्रसाद हनुमंत जाधव (वय ३०, रा. वरगळ, पोस्ट गोवे, ता. जि. सातारा) याने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वाहनाच्या वेगाकडे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवित पाठीमागून धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी निलेश पांडुरंग पाटील यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची नोंद शुक्रवारी सकाळी करण्यात आली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ठेंबे करीत आहेत. राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.





