शिक्रापुरात भीषण अपघात! ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू, आई आणि भाऊ गंभीर जखमी

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पाबळ चौकात झालेल्या भीषण अपघातात 11 वर्षीय कार्तिक राजाभाऊ चव्हाण या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला असून, त्याची आई व भाऊ जखमी झाले आहेत. दुचाकीला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गीता राजाभाऊ चव्हाण या आपल्या एमएच 12 टीबी 6149 या दुचाकीवरून दोन्ही मुलांना – कार्तिक व आर्यन – जिल्हा परिषद शाळा, कोयाळी पुनर्वसन येथे सोडण्यासाठी जात होत्या. पाबळ चौकातून जात असताना, शिक्रापूरहून पाबळकडे जाणार्या एमएच 12 पीझेड 3540 या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. धडकेचा जोर इतका होता की दुचाकीवरील तिन्ही जण रस्त्यावर फेकले गेले.
आसपासच्या नागरिकांनी तातडीने तिघांनाही जवळील रुग्णालयात दाखल केले; परंतु कार्तिक चव्हाण (वय 11) याला उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर गीता राजाभाऊ चव्हाण (वय 29), आर्यन राजाभाऊ चव्हाण (वय 10) हे जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर चालक अपघातानंतर वाहनासह फरार झाला. या संदर्भात कार्तिकचा वडील राजाभाऊ भारत चव्हाण यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बापू हाडगळे व विश्वांबर वाघमारे करीत आहेत.





