शेतकरी आंदोलनावर लवकरच निघणार तोडगा; केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले संकेत

नवी दिल्ली – दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनौपचारीक पातळीवर चर्चा सुरू असून शेतकरी आंदोलनावर नवीन वर्षाच्या आधी तोडगा निघेल असे संकेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले आहेत. आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या ज्या मुलभूत समस्या आहेत त्यावर चर्चा करून तोडगा काढण्याची सरकारची तयारी आहे. त्या विषयी कोणत्याही वेळी शेतकऱ्यांशी औपचारीक स्वरूपात पुन्हा चर्चा सुरू करण्याचीही सरकारची तयारी आहे.
पण जे लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन गोळीबार करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली. त्यांनी विरोधीपक्षांवर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, कृषी विषयक सुधारणांचे राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. ते म्हणाले की केंद्र सरकारने केलेले तीन कृषी विषयक कायदे हे शेतकऱ्यांच्याच हिताचे आहेत. शेतकऱ्यांना एमएसपी मिळेल याची लेखी ग्वाही द्यायला सरकार तयार आहे. मंडी पद्धतही कायमच राहील याचीही ग्वाही देण्यास सरकार तयार आहे असे त्यांनी नमूद केले.
आम्ही शेतकऱ्यांशी सुरू असलेली चर्चेची प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यास तयार आहोत चर्चेचे मार्ग आम्ही बंद केलेले नाहीत. या विषयावर चर्चेतूनच तोडगा निघू शकतो अशी सरकारची भूमिका आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. औपचारीक चर्चेतून काही मार्ग निघत नाही असे दिसल्याने आम्ही अनौपचारीक मार्गाने ही चर्चा सुरू ठेवली असून त्यातून काही तरी मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संबंधात सुप्रिम कोर्टाच्या पुढील निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आमच्या कायद्यातील प्रत्येक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि या कायद्यात काहीं त्रुटी आहेत असे शेतकऱ्यांनी पटवून दिले तर कायद्यात आवश्यक त्या दुरूस्त्या करण्यासही सरकार तयार आहे असेही ते म्हणाले.





