Hong Kong Sixes 2024 : टीम इंडियाचा दारूण पराभव, पाकची विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Hong Kong Sixes 2024 (IND vs PAK) : हाँगकाँग क्रिकेट सिक्स टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. पाकिस्तानी संघाने आता गट टप्प्यातील दोन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे.
या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना निर्धारित 6 षटकात 2 बाद 119 धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने हा सामना एकही विकेट न गमावता आणि 5 षटकात 121 धावा करत सहज जिंकला. दरम्यान, हाँगकाँग सिक्स टूर्नामेंटमध्ये एक संघ 6 खेळाडूंसह मैदानात उतरतो.
भारताकडून रॉबिन उथप्पा आणि भरत छिपली यांनी डावाची सुरुवात केली. उथप्पाने 8 चेंडूत 31 धावा केल्या, तर भरत 16 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी करून रिटायर्ड हर्ट झाला. केदार जाधवला केवळ 8 धावा करता आल्या आणि त्याच्यानंतर मनोज तिवारीने 7 चेंडूत नाबाद 17 धावांची तर स्टुअर्ट बिन्नीनं 2 चेंडूत नाबाद 4 धावांची खेळी करत संघाला 119 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानकडून फहीम अश्रफ हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 षटकात 50 धावा देत 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला यश मिळू शकले नाही.
विजयासाठी 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने एक षटक शिल्लक असताना सामना जिंकला. सलामीवीर मुहम्मद अखलाकने 12 चेंडूत 40 धावा केल्या, तर आसिफ अलीने या सामन्यात अक्षरशा कहर केला. त्याने केवळ 14 चेंडूत 55 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 7 षटकार आणि 2 चौकार लगावले. पण सामना संपण्यापूर्वीच तो रिटायर्ड हर्ट झाला. उर्वरित काम कर्णधार फहीम अश्रफने पूर्ण केले, ज्याने अवघ्या 5 चेंडूत 22 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Pakistan emerges victorious in the intense clash against team India, clinching victory by 6️⃣ wickets! 🇵🇰 #HongKong #AsiasWorldCity #Cricket #ItsRainingSixes pic.twitter.com/FM4gquFEAS
— Hong Kong Sixes (@HongKongSixes) November 1, 2024
भारतीय गोलंदाजांना एकही यश मिळवता आले नाही. टीम इंडियासाठी शाहबाज नदीमने सर्वाधिक धावा खर्च केल्या. त्याने 2 षटकात 57 धावा दिल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाही कारण त्यांनी यूएईला एकही विकेट न गमावता पराभूत केले होते.
IPL 2025 Retention : बंगळुरूने ‘या’ तीन खेळाडूंना ठेवलं कायम; विराटवर RCB ने केला पैशांचा वर्षाव…..
पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत…
हाँगकाँग सिक्स स्पर्धेच्या क गटात भारत आणि पाकिस्तानला स्थान देण्यात आले. पाकिस्तानने प्रथम युएईचा 6 विकेट्सनी पराभव केला आणि आता टीम इंडियाला देखील हरवून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. एक सामना गमावून भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने यूएईला हरवल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.





