PMP वाहकाचा प्रामाणिकपणा… ! प्रवासावेळी बसमध्ये विसरलेली 2 लाखांची रोकड प्रवाशाला परतवली

पुणे, दि. 22 – पिग्मी गोळा करून बॅंकेत भरण्यासाठी निघालेल्या प्रवाशाची दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पीएमपी बसमध्ये विसरली. पण, वाहकाच्या सतर्कतेमुळे ही बॅग डेपो मॅनेजरकडे देण्यात आली. दोन लाख रुपये हरवल्यामुळे चिंतातूर झालेला प्रवाशी त्याच्यांकडे असलेल्या बसच्या तिकीटावरून माग काढत कोथरूड डेपोत आला. त्याला दोन लाखांची रोकड असलेली बॅग परत मिळाली.
कात्रज डेपो ते कोथरूड डेपो या पीएमपी बसमधून शुक्रवारी सकाळी पिग्मी एजंट दत्ता निगडे हे बॅंकेत रोकड भरण्यासाठी निघाले होते. गुरुवारी दिवसभर संकलन झालेली दोन लाखांची रोकड घेऊन पद्मावती येथील एका बॅंकेत जात होते. बसमध्ये खूप गर्दी होती. बसमधून उतरताना गडबडीत त्यांची पैशांची रोकड असलेली बॅग सीटखाली विसरली. बसमधून खाली उतरल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आली. बस वाहक संदीप कदम यांना एका प्रवाशाने बॅग सीटखाली असल्याचे सांगितले. त्यांनी ती बॅग घेऊन बसमधील प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्यापैकी कोणीही ती बॅग त्यांची असल्याचे सांगितले नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड व कागदपत्रे होती. त्यामुळे कदम यांनी ती बॅग कोथरूडमध्ये वाहतूक नियंत्रक दुर्गेश नल्ला यांच्याकडे जमा केली. निगडे यांच्याकडे त्या पीएमपी बसचे तिकीट होते. त्यावरून त्यांनी बसची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती बस कोथरूड डेपोची असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ते कोथरूड डेपोमध्ये आले. त्यांनी बॅगबाबत चौकशी केली असता त्यांना त्यांची बॅग मिळाल्याचे सांगितले. त्यावेळी निगडे यांच्या डोळ्यांतून पाणी आले.
दोन लाख रूपये हरवले असते तर ते कोठून द्यायचे असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. पण, पीएमपीचे वाहक संजय कदम यांच्या सतर्कतेमुळे त्यांना दोन लाख रुपये परत मिळाले. त्यांनी कदम, कोथरूड डेपो व्यवस्थापक यशवंत हिंगे यांचे आभार मानले.




