nagar | मा. आ.भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदे गटात

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्याचे शिवसेना ठाकरे गटात असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी गुरुवारी मुंबई येथे रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार लोखंडे यांना शह देण्यासाठी महसूलमंत्री विखे यांची पडद्याआडून राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.
या पक्षप्रवेशान शिर्डी मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार असून, महायुतीकडून भाऊसाहेब कांबळे विरोधात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे असा सामना होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी कांबळे काॅंग्रेसचे पाच वर्षे आमदार होते. नंतर ते शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत होते. नुकताच उद्धव ठाकरे यांचा श्रीरामपूर तालुक्यातील दौरा पार पडला, तेव्हा मा.आ.कांबळे हे त्यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला.
तीन दिवसांपूर्वी खासगी विमानाने मुंबइला जाऊन गाठीभेटी घेतल्या गेल्या होत्या. त्यानंतर पक्षप्रवेशाचा निर्णय पक्का झाला.आगामी लोकसभा व पुढे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी उमेदवारीसाठी शब्द घेतला असल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. संभाव्य उमेदवारीवरून अनेक मातब्बरांत रस्सीखेच पहायला मिळत आहे. अद्याप येथे – कोणत्याही पक्षाने उमेदवारीची अधिकृत घोषणा केलेली नाही. अशातच कांबळे हे शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिर्डीतून काँग्रेसचे उमेदवार होते. ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून श्रीरामपूरची विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवसेनत दोन गट पडल्यानंतर ते ठाकरे गटासोबत होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या शिर्डी मतदारसंघातील दौऱ्यातही ते उपस्थित होते.
गुरुवारी रात्री त्यांच्या समवेत शिवसेना नेते विजय बडाख, देविदास सोनवणे यांच्यासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत माजी आमदार कांबळे म्हणाले की, आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीरामपूर विधानसभेचा शब्द घेतलेला आहे. तसेच जर शिंदे साहेबांनी लोकसभा लढण्याचा आदेश दिला तर लढण्याची आमची तयारी आहे. माझे सर्वांशी चांगले संबंध असून, त्यातून मला मदत होऊ शकते.




