घरकुल योजना गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल

सहायक प्रकल्प अधिकारी रोहिदास साबळे यांनी दिली फिर्याद
अकोले – आदिवासींच्या घरकुल योजनमध्ये एक कोटी 34 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अखेर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालीन सहायक प्रकल्प अधिकारी तानाजी बाबूराव पावडे व परीस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्याविरुद्ध अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर तब्बल आठ वर्षांनंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आदिवास विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी रोहिदास कोंडिबा साबळे यांनी सोमवारी रात्री फिर्याद दिली आहे. आदिवासी विभागाकडून 2008 ते 2012 दरम्यान अकोले तालुक्यातील राजूर कार्यालयाला 143 घरकुले मंजूर झाली होती. अकोले, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड तालुक्यांतील आदिवासी समाजासाठी ही घरकुले बांधण्यात येणे अपेक्षित होते. तत्कालीन प्रकल्प अधिकारी तानाजी पावडे यांनी परीस संस्थेला घरकुल बांधकामाचा ठेका दिला होता. परंतु, घरकुल न बांधता घरकुल योजनेतील पैसे लाटल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर राज्यभरातील आदिवासी विभागातील योजनांची चौकशी गायकवाड समितीमार्फत करण्यात आली होती.
या चौकशीमध्ये काही ठिकाणी घरे बांधण्यात आली होती, तर काही ठिकाणी अर्धवट घरे बांधून योजनेतील पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. संबंधित अधिकारी व संस्थेविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासींसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केली होती. गायकवाड समिती चौकशीनंतर अखेर सोमवारी रात्री राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तत्कालीन अधिकारी पावडे यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुल बांधकामाचा ठेका परीस संस्थेस दिला होता. निविदा प्रक्रिया न राबविता परीस संस्थेस ठेका दिला होता. त्यानंतर परीस संस्था व पावडे यांनी सरकारी योजनेची अंमलबजावणी न करता आदिवासींच्या नावे आलेली एक कोटी 34 लाख 45 हजार रुपयांची रक्कम काढून अपहार करून सरकारची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.





