पहिल्या तिमाहीत घरांची विक्री दुपटीने वाढली

नवी दिल्ली – एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये घरांची विक्री वार्षिक पातळीवर जवळ-जवळ दुपटीने वाढून 68.5 दशलक्ष वर्ग फुट इतकी झाली आहे. मात्र गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे या तिमाहीत घरांची विक्री कमी झाली होती. त्यामुळे या वर्षी घरांची विक्री वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
तिमाही पातळीवर म्हणजे जानेवारी ते मार्चच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीत भारतातील पुण्यासह आठ मोठ्या शहरात घरांच्या विक्रीत 19 टक्क्याची घट झाली आहे असे ईक्रा या आर्थिक विश्लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 84.7 दशलक्ष वर्ग फुट इतक्या क्षेत्रफळाच्या घराची विक्री झाली होती.
त्या तुलनेमध्ये एप्रिल ते जून या तिमाहीत 68.5 दशलक्ष वर्गफूट इतक्या क्षेत्रफळाच्या घराची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत लॉक डाऊनमुळे केवळ 33.7 दशलक्ष वर्ग फूट क्षेत्रफळाच्या घरांची विक्री झाली होती.
या अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, आता लॉकडाऊन कमी करण्यात आले आहे, त्याचबरोबर विविध शहरांमध्ये लसीकरण वेगात चालू आहे. घरातून काम करण्याची पद्धत निर्माण झाल्यामुळे घरांची मागणी वाढत राहण्याची शक्यता आहे. सध्या बरीच तयार घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर व्याजदर अतिशय कमी पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात घरांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतामध्ये दिवाळी दसरा असे सण लवकरच येत आहेत. त्या काळात घरांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. ज्या ग्राहकांकडे क्षमता आहे असे ग्राहक या काळात खरेदीचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काही क्षेत्र वेगाने पूर्वपदावर येत आहेत. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगारही वाढत आहे. उत्पन्नाची हमी मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचारी घरे खरेदी करण्याची शक्यता वाढली आहे.
मात्र एकदा व्याजदरात वाढ होण्यास सुरूवात झाल्यानंतर घरांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विकासकांनी जीएसटी संदर्भात सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्याकडे लक्ष देण्याची गरज यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काही विकसकांनी व्यक्त केली.





