उदयपूर (राजस्थान): अमेरिकेतील प्रसिद्ध फार्मा उद्योजक राम राजू मन्तेना यांची कन्या नेत्रा मन्तेना आणि उद्योजक वम्सी गदिराजु यांचा शाही विवाह सोहळा सध्या ‘सिटी ऑफ लेक्स’ (सरोवरांचे शहर) उदयपूरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. २१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय सोहळ्यामुळे हे शहर आंतरराष्ट्रीय व्हीव्हीआयपी गेस्टसाठी एका ग्लॅमरस डेस्टिनेशनमध्ये बदलले आहे. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्यासह आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जेनिफर लोपेझ (JLo) आणि जस्टिन बीबर उपस्थितीतीने या विवाहसोहळ्याची तुलना थेट भारतातील सर्वात मोठ्या विवाह सोहळ्यांशी (उदा. अंबानींचा सोहळा) केली जात आहे. संगीत सोहळ्यात बॉलीवूडचा तडका – शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी सिटी पॅलेसमध्ये आयोजित ‘बॉलीवूड नाईट’ संगीत सोहळ्याने उपस्थितांना वेड लावले. यावेळी अभिनेता रणवीर सिंह याने आपल्या ‘झुमका’ गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स दिला. विशेष म्हणजे रणवीरने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि त्यांची मैत्रीण बेट्टिना अँडरसन यांना स्टेजवर आणून डान्स करायला लावले. चित्रपट निर्माता करण जोहर याने आपल्या खास शैलीत ‘स्पिल द टी विथ मी’ हा टॉक शो होस्ट केला, ज्यामध्ये वधू-वरांनी सहभाग घेतला. याशिवाय वरुण धवन, क्रिती सॅनॉन, शाहिद कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस या बॉलीवूड कलाकारांनीही आपल्या नृत्याने रंगत आणली. शनिवारी रात्री (२२ नोव्हेंबर) जेनिफर लोपेझ आणि जस्टिन बीबर यांचा परफॉर्मन्स अपेक्षित आहे. मुख्य समारंभ जगप्रसिद्ध ‘जगमंदिर’ पॅलेसमध्ये – हा भव्य सोहळा उदयपूरमधील अनेक ऐतिहासिक आणि आलिशान ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, ज्यात ‘द लीला पॅलेस’, सिटी पॅलेस येथील ‘जनाना महल’, ‘मानक चौक’ आणि मुख्य विवाहस्थळ म्हणून प्रसिद्ध ‘जगमंदिर आयलंड पॅलेस’ यांचा समावेश आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी लेक पिछोलाच्या मध्यभागी असलेल्या जगप्रसिद्ध जगमंदिर आयलंड पॅलेस येथे मुख्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्याच रात्री रिसेप्शन आयोजित केले जाईल. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था – आंतरराष्ट्रीय व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे उदयपूर शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह अमेरिकेच्या सुरक्षा पथकांनी प्रमुख मार्ग आणि आलिशान हॉटेल्सचा ताबा घेतला आहे. नेत्रा मन्तेना या अमेरिकेत फार्मा क्षेत्रातील एक मोठे नाव असलेल्या राजू मन्तेना यांच्या कन्या आहेत. तर, वम्सी गदिराजु हे ‘फोर्ब्स 30 अंडर 30’ यादीत समाविष्ट असलेले यशस्वी तंत्रज्ञान उद्योजक आहेत. हा विवाहसोहळा केवळ एका शाही कुटुंबाचा नसून, तो बॉलीवूड, हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय जगताचे अनोखे मिलन दर्शवणारा एक जागतिक कार्यक्रम ठरला आहे.