धक्कादायक ! उदयपूरमध्ये परदेशी तरुणीवर घातल्या गोळ्या

उदयपूर : उदयपूर शहरात शनिवारी सकाळी एका परदेशी तरुणीवर सार्वजनिकरित्या गोळ्या झाडण्यात आल्या. तिच्या डाव्या हाताच्या खालच्या बरगडीत गोळी लागली. तीन मुलांनी मुलीला खासगी रुग्णालयात सोडून पळ काढला. प्रकरण संशयास्पद असल्याने जखमीला महाराणा भूपाल (एमबी) रुग्णालयात पाठवण्यात आले.
मुलीवर उपचार सुरू आहेत. एसपी योगेश गोयल म्हणाले- मिस थाई थेम चुक (२४) असे मुलीचे नाव आहे. ती थायलंडची आहे. मुलगी दारूच्या नशेत होती आणि तिने चौकशीत सहकार्य केले नाही. ती चार दिवसांपासून उदयपोल (माळी कॉलनी) येथील हॉटेल वीर पॅलेसमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. मुलीचा मोबाइलही तपासला जात आहे. त्याच्यातून काही सुगावा लागण्याची शक्यता आहे.
एसपी म्हणाले, आज सकाळी 6 वाजता एमबी हॉस्पिटलमधून माहिती मिळाली की एका परदेशी मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले आहे. पॅसिफिक मेडिकल कॉलेजची ॲम्ब्युलन्स तिला घेऊन आली. 4:30 वाजता काही अनोळखी मुलांनी मुलीला आपत्कालीन कक्षात सोडले होते. तरुणीच्या अंगात गोळी अडकली आहे. डॉक्टर उपचार करत आहेत. रात्री दीड वाजता मुलगी कोणासोबत गेली? तिला रुग्णालयात कोणी सोडले? जवळपास लावलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास करण्यात येत आहे.
हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री दीड वाजता मुलगी हॉटेलमधून खाली उतरली आणि 1.31 वाजता बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीतून निघून गेल्याचे फुटेजमधून समोर आले आहे. मुलगी बहुधा टुरिस्ट व्हिसावर इथे आली असावी. अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. एसपी म्हणाले- हॉटेलवाले, बार ऑपरेटर किंवा कुणालाही मुलीबद्दल काही माहिती असेल तर कृपया पोलिसांना कळवा. ती का बाहेर गेली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.





