पुणे जिल्हा | होळी रे होळी पुरणाची पोळी…

नारायणगाव, (वार्ताहर) – भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरा करणारा होळीचा सण नारायणगाव (ता. जुन्नर) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घरासमोर, चौकाचौकात, मंदिरासमोर होळी पेटवून महिलांनी हिंदू संस्कृती प्रमाणे पुजा केली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी रे होळी पुरणाची पोळी अशी बोंब मारण्यात आली.
होळी सणाकडे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून बघितले जाते. हिरण्यकश्युपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाची आठवण करून देतो. वसंत ऋतुत कापणीच्या चांगल्या हंगामासाठी होळीचे महत्त्व आहे. होळी रंगाचा सण असून होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन नावाने ओळखला जातो. हिरण्यकश्यप नावाचा राक्षस स्वतःला देव मानत होता तर त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता.
परंतु हिरण्यकश्यपाला भक्ती आवडत नसल्याने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला. हिरण्यकश्यपाची बहीण होलिका प्रल्हादाला मारण्यासाठी अग्निप्रवेश करते, तरीही देवतांच्या मदतीने प्रल्हाद वाचतो आणि बहिण होलिका जळते अशी कथा सांगितली जाते. होळी सण भगवान शिव आणि कामदेव यांच्यातील संघर्षाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.





