लोहरी सणाला शेतकऱ्यांकडून कृषी कायद्यांची होळी

नवी दिल्ली – दिल्लीत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी लोहरी सणाला नव्या कृषी कायद्यांची होळी केली. पंजाबमधील शेतकरी वसंत तू सुरू होताना लोहरी सण साजरा करतात. त्यावेळी विविध खाद्यपदार्थांसह शेकोटी पेटवण्यात येते. योगायोगाने दिल्लीतील निदर्शनांचा 50 वा दिवस या सणाला आला आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची त्यांना कल्पना दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी काल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह चौताला यांनी काल चर्चा केली होती.
त्यानंतर राज्यातील आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा या नेत्यांनी दिला होता.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या कायद्यांना स्थगिती दिली होती. त्याच वेळी या कयद्याचा विचार करण्यासाठी चार जणांची समिती नेमण्यात आली होती. त्यांना या कायद्यांबाबत अहवाल देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्या अहवालाद्वारे या कायद्याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
बंदी घातलेल्या संघटना या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत आहेत का? याबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले होते. न्यायालयात या शेतकरी आंदोलनात खलिस्तानींनी शिरकाव केल्याचे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले होते. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे विधान केल्याचे ते म्हणाले होते.
या निकालावर प्रतिक्रिया देतान शेतकरी संघटनांनी या समितीशी चर्चा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याची भूमिका मांडली होती. ही समिती म्हणजे सरकारवरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले होते.





