Maharashtra news : होळीच्या सणाला गालबोट लागणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत घडलेल्या या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. भंडाऱ्यात भीषण अपघात तुमसर-भंडारा मार्गावरील खापा खरबी फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ३२ वर्षीय गोलू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला. या घटनेत अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल चार तास चक्काजाम आंदोलन केलं. पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप करत नागरिकांचा रोष अनावर झाला होता. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली. मृताच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली. गोंदियात तलावात बुडून दोघांचा मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा येथे रंगपंचमी साजरी केल्यानंतर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. सागर गहाणे (१६) आणि प्रणय गहाणे (१३) अशी मृतांची नावे आहेत. रंग खेळल्यानंतर काही मुले तलावात अंघोळीसाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे खोल पाण्यात गेले आणि बुडाले. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनांमुळे होळीच्या उत्साहावर विरजण पडले असून दोन्ही जिल्ह्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.