HMPV Virus । सुमारे ५ वर्षांपूर्वी वुहानमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता. या व्हायरसने संपूर्ण जगाला ‘लॉक’ आणि ‘डाउन’ दोन्हीही केले होते. या व्हायरसमुळे सुमारे 71 लाख लोकांचा मृत्यू झाला. कोरोनानंतर आता चीनने पुन्हा एकदा जगाला धडकी भरवली आहे. ती म्हणजे ‘HMPV’ या नवीन व्हायरसच्या माध्यमातून… या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ तर घातला आहेच पण भारतातही या व्हायरसने एन्ट्री केली आहे. या सगळ्या परिस्थिती सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जगभरातील सर्व धोकादायक व्हायरस हे फक्त चीनमधूनच का पसरतात? यामागे काय कारणे आहेत? चीनमधून आतापर्यंत किती धोकादायक व्हायरस पसरले आहेत… जेव्हा जेव्हा चीनने संपूर्ण जगाला धडकी भारावली HMPV Virus । जगातील अनेक धोकादायक व्हायरस चीनमधून पसरले आहेत यात शंका नाही. जरी तुम्हाला वाटत असेल की चीनमधून पसरणारा सर्वात धोकादायक रोग म्हणजे कोरोना आहे. पण तसे नाही. चीनमधून उद्भवणारी सर्वात विनाशकारी महामारी म्हणजे प्लेग किंवा ब्लॅक डेथ ज्याने आफ्रिका, आशिया आणि युरोपला 1346 ते 1353 पर्यंत उद्ध्वस्त केले. यात 75 ते 200 दशलक्ष लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे. सहाव्या, 14व्या आणि 19व्या शतकात जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या प्लेगच्या प्रमुख लाटा चीनमधून उद्भवल्या. तर, गेल्या 100 वर्षांचा विचार केला तर चीनमधून 1918, 1957, 2002 आणि 2019 मध्ये साथीचे रोग पसरले. 1957 च्या महामारीची गोष्ट …HMPV Virus । तसेच 1957-1959 दरम्यान जगात एक भयंकर आपत्ती आली. या साथीला ‘एशियन फ्लू’ असे नाव देण्यात आले. कारण तो चीनमधून जगभर पसरला होता. केवळ 2 वर्षात या फ्लूमुळे जगभरात सुमारे 20 लाख लोकांचा मृत्यू झाला यावरून या साथीच्या प्रादुर्भाव किती भयानक होता याचा अंदाज जाऊ शकतो. त्याआधी 1918 मध्ये आपत्ती आली होती 1918 मध्ये ‘स्पॅनिश फ्लू’ या नावाचा एक साथीच्या रोगाचा प्रसार झाला. मात्र, ही महामारी अशा वेळी आली जेव्हा जगात पहिल्या महायुद्धाची चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळच्या सर्व सेन्सॉरशिपमुळे, ही महामारी जगात कशी पसरली हे स्पष्ट होत नाही. पण अनेक अहवालांमध्ये या रोगाचा उगम चीनमध्येच झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 1918 च्या महामारीला शतकातील सर्वात प्राणघातक महामारी म्हणून ओळखलं गेलं. या महामारीमुळे जगभरात 20 दशलक्ष ते 50 दशलक्ष लोक मरण पावले. काही अहवालांनी हा आकडा 100 दशलक्षच्या जवळ सांगितला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, सुमारे 500 दशलक्ष लोक, म्हणजे त्यावेळच्या जगाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 30%, या साथीच्या रोगाला बळी पडत होते. त्याचप्रमाणे 2002 मध्ये पसरलेल्या सार्स (SARS) महामारीनेही विध्वंस घडवून आणला आणि तोही चीनमधूनच जगामध्ये पसरला होता. हे विषाणू चीनमधूनच का पसरतात ? जगातील अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चीनमधून व्हायरसचा प्रसार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची असणारी दाट लोकसंख्या. जी प्राण्यांच्या अनेक प्रजातींच्या थेट संपर्कात येते. तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्वच्छतेबाबतही चीनमध्ये अनेक समस्या आहेत. इकोहेल्थ अलायन्सचे अध्यक्ष डॉ. पीटर दासझॅक यांनी एका मुलाखतीत, “दक्षिण मध्य चीन हे विषाणूसाठी ‘मिश्रण करणारे जहाज’ आहे.” असे म्हटले होते. अस्वच्छता आणि हलगर्जीपणाने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. त्यांनी सांगितले होते की शेतकरी अनेकदा त्यांची जनावरे ‘वेट मार्केट’मध्ये म्हणजेच ‘ओल्या बाजारात’ आणतात ज्याठिकाणी ते सर्व प्रकारच्या विदेशी प्राण्यांच्या संपर्कात येतात. चीनची सांस्कृतिक कारणेही कारणीभूत चीनमधील सांस्कृतिक कारणेही त्याठिकाणी व्हायरस पसरण्यास कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. चीनमध्ये ताज्या मांसाचा वापर जास्त आहे. चिनी लोकांचा असा विश्वास आहे की ताजे मांस गोठवल्यापेक्षा चवदार आहे. याठिकाणी उघड्यावर प्राण्यांचे मांस तोडणे सर्रास आहे, त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका नेहमीच असतो. तर दुसरीकडे चिनी लोकांची आणखी एक सामान्य सवय आहे. ती म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा बहुतेक लोक प्रथम पारंपारिक चीनी औषध (TCM) शोधतात. जिथे लोकांना उपचाराच्या नावाखाली ॲक्युपंक्चर किंवा कुचकामी हर्बल तसेच प्राणी उपाय सांगितले जातात. यामुळे अधिक प्राणी मारले जातात आणि लोकांमध्ये व्हायरस पसरण्याचा धोकाही वाढतो. त्यासोबतच चिनी शास्त्रज्ञांचे प्राण्यांवर केलेले प्रयोग नेहमीच वादात सापडले आहेत. चीन त्याच्या चुकीची माहिती, गुप्तता आणि सेन्सॉरशिपसाठी देखील ओळखला जातो, ज्यामुळे नवीन रोग उद्भवण्याची आणि पसरण्याची शक्यता वाढते. कोरोना महामारी हे अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण आहे. हे पण एक कारण आहे… काही तज्ञांचा असा दावा आहे की, आशिया आणि आफ्रिकेतील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या खेड्यांमधून शहरांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे देखील विषाणूचा प्रसार होतो. संपूर्ण आशिया आणि पॅसिफिकमध्ये जलद शहरीकरण होत आहे, ज्याठिकाणी जगाच्या 60% लोक आधीच राहतात. जागतिक बँकेच्या मते, 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात पूर्व आशियातील अंदाजे 200 दशलक्ष लोक शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यातही चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित झाल्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत. त्यामुळे पर्यावरण पूर्णपणे बदलले त्याचा परिणामही लोकांच्या आरोग्यावर पडत आहे. HMPV व्हायरस काय आहे ? आता चीनमध्ये पसरलेल्या नव्या व्हायरसचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही आहे. त्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखीच आहेत. सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला, सतत नाक वाहणे किंवा घसा खवखवणे होतो. एचएमपीव्ही संसर्ग लहान मुले आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो. आता अशा परिस्थितीत या नव्या व्हायरसने पुन्हा जर जगाला वेठीस धरले तर पुन्हा एकदा कोरोना सारखी परिस्थिती उद्भवू शकते. मात्र यावर देखील लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे.