हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर चकमकीत ठार

12 लाख रुपयांचे होते बक्षिस; अन्य दोन दहशतवादीही चकमकीत ठार
श्रीनगर: हिज्बुल मुजाहिदीनचा वरिष्ठ कमांडर रियाझ नायकू याचा आज जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला. त्याच्याबरोबर शारशाली ख्रीवू या भागात झालेल्या एका अन्य चकमकीमध्ये अन्य दोन दहशतवादीही चकमकीमध्ये ठार झाले. पुलवामा जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री ही चकमक झाली असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
हिज्बुल मुजाहिदीन या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे काश्मीर खोऱ्यातील नेतृत्व नायकू हा करत होता. नायकू काही थेट कृती करण्याची शक्यता आहे, असे समजल्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून त्याच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवले गेले होते.
पुलवामा जिल्ह्यातील बायगबोरा गावामध्ये तो असल्याच्या माहितीवरून राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि विशेष कृती दलाच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला घेरले. स्थानिक पोलिसांनी या सर्व भागाची पूर्ण नाकाबंदी केली आणि मग कारवाईला सुरुवात झाली होती. रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरू होती. ही कारवाई संपत आली असताना जम्मू काश्मीर पोलिसांनी सर्व सुरक्षा दलांना वाहनांचे ताफ्यांच्या हालचाली ताबडतोब थांबवण्याची सूचना केली होती. तसेच संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सर्व वाहनांचा प्रवासही थांबवण्यात आला आणि वाहने सोडून जाणेही टाळले जावे, असेही सांगण्यात आले. तो कोणत्याही वाहनातून निसटून जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. चकमकीदरम्यान त्याचा खात्मा झाल्याची माहिती आज दुपारी सुरक्षा रक्षकांच्यावतीने जाहीर करण्यात आली.
त्याच्यावर तब्बल 12 लाख रुपयांचे बक्षिस लावले गेले होते. त्याचा खात्मा झाल्यामुळे आता दक्षिण काश्मीर बहुतांश दहशतवाद मुक्त झाल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. काश्मीर खोऱ्यात आता हिज्बुल मुजाहिदीनचा कोणीही म्होरक्या राहिलेला नाही. या संघटनेमध्ये फूट पडून “द रेसिस्टन्स फ्रंट’ नावाने पाकिस्तानात नवीन संघटना उदयास आली आहे.
कोण होता रियाझ नायकू
नायकू हा व्यवसायाने शिक्षक होता. भूमिगत राहून दहशतवादी कृत्यांसाठी पाठबळ मिळवण्यात तो नेहमी आघाडीवर असायचा. हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी याचा 8 जून 2018 रोजी अनंतनागमधील कोकारनाग येथे सुरक्षा रक्षकांनी खात्मा केल्यानंतर या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व रियाझ नायकू करत होता. तो गेल्या आठ वर्षांपासून काश्मीर खोऱ्यामध्ये सक्रिय होता. रमझान महिन्याच्या काळात तो अधिक सक्रिय होत असे. या दिवसात जास्तीत जास्त स्थानिक युवकांना घातपाताच्या कार्यात सक्रिय होण्यासाठी तो चिथावणी देत असे. जम्मू काश्मीरमधील प्रमुख दहशतवादी हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधारही तोच होता. त्याने सुरक्षा रक्षकांवरील हल्ल्यांचेही नियोजन केले होते.
हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या झाकिर मुसा याचा तो उत्तराधिकारी होता. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्याविरोधात परदेशात एक अभियानही छेडले होते. युट्युब आणि सोशल मिडीयावर तो चिथावणीचे संदेश व्हायरल करत असे. चकमकींमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कामाचा सोशल मिडीयावरून गौरव करायला ही त्याने सुरुवात केली होती. मरण पावलेल्या दहशतवाद्यांना बंदुकीच्या फैरींची सलामी देण्याची प्रथाही त्यानेच सुरू केली होती. झाकिर मुसाला दक्षिण काश्मीरमध्ये त्यानेच प्रसिद्ध केले होते. मुसा गेल्या वर्षी मे महिन्यात सुरक्षा रक्षकांकडून मारला गेला होता. हिज्बुल मुजाहिदीनचे काश्मीर खोऱ्यातील नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून नायकू सुरक्षा रक्षकांच्या हिट लीस्टवर होता.





