स्वतःच्या जहाजालाच धडक! दक्षिण चीन समुद्रातील चिनी नौदलाचा मोठा गोंधळ

बीजिंग – चीनच्या नौदलाच्या एका जहाजाची चीनच्याच तटरक्षक दलाच्या बोटीला धडक कझाली आहे. सोमवारी वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रामध्ये स्कारबरो शोअल येथे फिलिपीन्सच्या गस्त नौकेचा पाठलाग करत असताना हा अपघात झाला, असे फिलिपीन्सच्या माध्यमांनी म्हटले आहे.
या भागातील मच्छिमारांच्या नौकांना मदत साहित्याचे वितरण करणाऱ्या बोटींना फिलिपीन्सच्या गस्ती नौका ओढून नेत असताना चीनच्या नौदलाच्या जहाजाने या नोकेचा पाठलाग सुरू केला होता.
त्यावेळी १४४ क्रमांकाचे चिनी नौदलाचे मोठे जहाज आणि चीनच्याच तटरक्षक दलाच्या ३१०४ क्रमांकाच्या नौकेमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेमुळे चीनच्या तटरक्षक दलाच्या नौकेचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान इतके जास्त आहे, की या नौकेची आता दुरुस्ती केली जाऊ शकणे शक्य नाही.
या धडकेच्या चा व्हिडीओ देखील फिलिपीन्सने प्रसिद्ध केला आहे. चीनच्या नौदलाच्या जहाजांच्या हालचाली फिलिपीन्सच्या सागरी गस्त करणाऱ्या नौकांसाठी किती धोकादायक आहेत, हेच यातून दिसून येत असल्याचे फिलिपीन्सने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे चीनच्या नौदलाने मात्र आपली कारवाई कायद्यानुसार करण्यात आल्याचे म्हटले आहे. या अपघाताला फिलिपीन्सच्या गस्त नौकेची घुसखोरीच जबाबदार असल्याचे चीनच्या नौदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. दक्षिण चीन समुद्रामध्या चीन आणि फिलिपीन्सच्या जहाजांमध्ये नेहमी सागरी हद्दीच्या मुद्दयावरून संघर्षाची स्थिती निर्माण होत असते. जागतिक सागरी व्यापारापैकी ६० टक्क्यांहून अधिक व्यापार वादग्रस्त जलमार्गातून होतो. मात्र चीनने या दक्षिण चीन समुद्राच्या बहुतेक भागावर चीनचा हक्क असल्याचा दावा केला आहे.





