किव्ह, (युक्रेन) – युक्रेनच्या राजधानीमध्ये घुसण्याचे रशियाच्या फौजांकडून निकराचे प्रयत्न सुरू आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला प्रारंभ झाल्यापासून, गेल्या तीन आठवड्यांपासून युक्रेनच्या सैन्याकडून रशियाच्या फौजांना जोरदार प्रतिकार केला जातो आहे. रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्ह आणि आजूबाजूच्या परिसरांवर जोरदार हल्ले अजूनही सुरूच आहेत.
रशियाकडून बॉम्बफेक सुरूच आहे. मात्र त्याबरोबर सैन्य पुढे सरकण्याची गती थोडी मंदावली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चेला यश मिळण्याची आशा व्यक्त व्हायला लागली होती. ही चर्चा पुन्हा सुरू होईल, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलदिमिर झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.
किव्ह शहराच्या आजूबाजूला रशियाकडून जोरदार बॉम्बवर्षाव सुरू आहे, रॉकेटच्या माऱ्यामुळे शहरातील एक 12 मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. रशियाच्या फौजा शहरामध्ये घुसू शकल्या नाहीत. म्हणून हा बॉम्बवर्षाव सुरू ठेवण्यात आला आहे. नागरी वसाहतींना लक्ष्य करण्यासाठी रशियाकडून लांब पल्ल्यांच्या रॉकेटचा मारा केला जाऊ लागला आहे. रशियाच्या फौजांच्या हालचालींबाबत ब्रिटीश आणि मेरिकेच्या गुप्तचरांकडून युक्रेनच्या नेत्यांना वेळोवेळी माहिती पुरवली जाते आहे.
युक्रेनचे ध्यक्ष झेलेन्सकी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा संयम दाखवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ट सभागृहाला थेट संबोधित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे नाटोच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी आज ब्रुसेल्समध्ये एकत्रितपणे चर्चा करण्याचे ठरवले आहे.